मुंबई Kangana Ranaut for Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून देशात जवळपास (काही अपवाद वगळता) सर्वच राज्यातील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून लवकरच अंतिम यादी जाहीर होणार आहे. मात्र, जाहीर झालेल्या यादीमध्ये बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनाला कोणत्या कारणामुळे लोकसभा उमेदवारी मिळाली? काय आहेत कारणे? हे जाणून घेऊयात...
हिंदुत्वाचा उघडपणे प्रचार :बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत आपल्या सडेतोड आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. कंगना ही वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. तिच्या बिनधास्त बोलण्यामुळं ती अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने केलेल्या अनेक वक्तव्यामुळं तिला टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. बॉलिवूडमधूनही तिच्यावर टीका करण्यात आली. 2014 साली भाजपाची केंद्रात सत्ता आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपाला पाठिंबा देत असून, मोदींच्या कामाची स्तुती करत आहे. कंगना उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. बॉलीवूडमध्येही कंगनाची कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण झालेली आहे. कंगनाने उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे तिला सिनेमात काम मिळणार नाही, असंही बोलत जात होतं, पण याची कंगनानं पर्वा केली नाही. मागील काही वर्षापासून कंगनाने काही चित्रपट केले. त्यातून तिनं हिंदू धर्माचा उघड प्रचार केल्याचं दिसून येतं.
हिंदुत्वाची भूमिका कंगनाच्या पथ्यावर? :अभिनेत्री कंगना रणौत ही वारंवार हिंदू धर्माबद्दल बोलत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ती अधूनमधून भेट घेत असते. 370 कलम रद्द केल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारचे आणि मोदींचं कंगनानं कौतुक केलं. आपल्या बोलण्यातून आपण कट्टर हिंदू आहोत हे ती सतत दाखवत असते. हेच भाजपाने हेरून कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कंगनाची लोकसभा उमेदवारीची वर्णी लागली असा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
कंगनाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसची टीका :काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी इन्स्टाग्रामवरून कंगना रणौतचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह कॅप्शन लिहिली होती. या पोस्टवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कंगनाच्या उमेदवारीवरुन टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने सडेतोड उत्तर दिलं आहे. 2019 साली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली होती. मग तुम्ही पण एका अभिनेत्रीला त्यावेळी कशी काय उमेदवारी दिली? असा सवाल भाजपाने उपस्थित करत, काँग्रेसला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
शेवटी कलाकारालाही विचारधारा असतेच :कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा कलावंत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. कलाकारालाही त्याची वैयक्तिक भूमिका आणि विचारधारा असतेच. कंगनाही एक माणूस आहे... जर तिने हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली तर त्यात तिला आपण चुकीचे ठरवणारे कोण? असं सिनेतज्ञ श्रीराम खाडीलकर यांनी म्हटलं आहे. कोणत्या पक्षाने कुठल्या कलावंताला उमेदवारी द्यायची तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु कोणीही कलाकार एखाद्या पक्षाचे समर्थन करत असेल किंवा एखादी भूमिका घेत असेल तर त्यात गैर काय? असंही खाडीलकर यांनी म्हटलंय. आता कंगनाला मंडीमधून उमेदवारी मिळाली आहे. परंतु मंडीमधून तिला लोकं स्वीकारतात का? तिला मतदान मिळते का? आणि ती विजयी होते का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. पण कंगना हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करते म्हणून तिला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली, असं म्हणणे चुकीचे आहे. कारण भाजपा पक्षाची विचारधारा आणि भूमिका वेगळी आहे. भाजपाची भूमिका आणि विचारधारा जर कंगनाला पटत असेल तर त्यात वावगं काय? दोन माणसांची एकसारखी भूमिका असू शकते किंवा दोन माणसांची वेगवेगळी भूमिका आणि मतं असू शकतात. त्यामुळे शेवटी कलाकार हा देखील एक माणूस आहे... त्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र असतं. त्याची एक वेगळी विचारधारा असू शकते, असंही 'ईटीव्ही भारत'शी बोलताना श्रीराम खाडीलकर यांनी म्हटलं आहे.
मंडी मतदारसंघात काय आहेत समीकरणं? :हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. येथून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह सलग ६ वेळा खासदार होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या सलग ३ वेळा खासदार राहिल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने थेट सेलिब्रिटी कंगनाला तिकिट दिलं आहे. त्यामुळं कंगना येथून निवडून येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.