महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलढाण्यातील नागरिकांचं का पडत आहे टक्कल? अज्ञात आजाराची लागण - BULDHANA BALD INFECTION

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा गावांमध्ये तीन दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय.

Why are the citizens of Buldhana going bald Infection
बुलढाण्यातील नागरिकांचं का पडत आहे टक्कल (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2025, 1:29 PM IST

बुलढाणा-सध्या राज्यात आरोग्य प्रशासन चीनमध्ये आलेल्या विषाणूमुळे अलर्ट मोडवर आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये एका विचित्र आजाराच्या साथीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा गावांमध्ये तीन दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत आरोग्याचं सर्वेक्षण सुरू केलंय. परंतु हा नेमका काय प्रकार आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.

हा अज्ञात आजार नेमका कोणता? :गावात जवळपास 50 हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होतेय, काही दिवसांत त्यांची टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेत, हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वत्र चर्चा असून, एकच खळबळ उडालीय. तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. त्यामुळेच आता बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातल्याचे समोर आलंय. गावातील कुटुंब या व्हायरसचे बळी ठरत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण :सुरुवातीला डोके खाजवण्यासारखी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर हळूहळू केसगळती सुरू होते. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून, ग्रामस्थ वापरात असलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात आलेत आणि ते तपासासाठी पाठवण्यात आलेत. पाण्याचा अहवाल आल्यानंतरच हा नेमका प्रकार काय आहे हे समजणार आहे. विशेष म्हणजे केसगळतीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. नागरिकही खासगी डॉक्टरकडे उपचार घेत आहेत. पाण्याच्या स्त्रोत दूषित आहे का? याचा तपास सुरू असून, पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिलीय. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. काही रुग्णांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शाम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो, अशी माहिती मिळालीय. मात्र याला कुठलाच दुजोरा देण्यात आलेला नाही.

सर्वेक्षणात आढळले 30 पेक्षा जास्त बाधित :जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंड गावात सर्वेक्षण केले, त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती आहे. याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून, त्यांच्याकडून रुग्णांची लक्षण आणि उपचार सुरू करण्यात आलेत. एकीकडे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्यमंत्री असताना नेमकं अशा घटना पुढे आल्यानंतर उपाययोजना आणि तत्पर पावले का उचलली जात नाहीत हादेखील एक प्रश्न आहे. आता तरी या सर्व बाबी पुढे येत असल्याने तातडीची पावले उचलत नेमकं याचं निदान करणं गरजेचं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बुलढाण्यातील नागरिकांमध्ये अज्ञात आजाराची लक्षणं (Source- ETV Bharat)

फंगल इन्फेक्शनची शक्यता : खरं तर हा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शनची शक्यता असू शकते, कारण फंगल इन्फेक्शनमुळे टक्कल पडू शकते. गावामधील पाण्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे व्हायरसेस किंवा काही मिसळले असेल, ते पाणी डोक्यावर घेतल्याने टक्कल पडू शकते. त्या गावांमध्ये एक दोन दिवस आधी शाम्पू विकण्यासाठी एक व्यक्ती आला होता, तो सांगत होता की, हा शाम्पू लावल्यामुळे केस घनदाट होऊ शकतात, अशी माहिती मिळालीय. त्या अनुषंगाने ज्या लोकांनी शाम्पू विकत घेतलाय, त्यांचेच केस गळतात का? त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात येणार आहे, अशा तीन शक्यता असू शकतात. पण सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत. नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नये, कारण केस हा बाह्य भाग आहे. केसामुळे जीव जाऊ शकत नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. "बांगलादेशात अन्याय होत असलेल्या हिंदूंना भारतात आश्रय द्या", महंत रामगिरी महाराजांची मागणी
  2. बोललो त्यावर ठाम, परिणामाची चिंता नाही; महंत रामगिरी महाराजांनी ठणकावलं - Mahant Ramgiri Maharaj Statement

ABOUT THE AUTHOR

...view details