मुंबईHoarding collapsed in Ghatkopar :सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरमध्ये मोठं होर्डिंग कोसळल्यानं 14 जणांचा मृत्यू झाला. 74 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर 'ब्लेम गेम'ला सुरुवात झाली आहे. या अपघातानंतर पालिकेनं आपले हात वर केले असून, हे सर्व प्रकरण रेल्वे पोलिसांच्या दरबारी ढकललं आहे. सध्याच्या रेल्वे पोलीस आयुक्तांनी देखील या अनधिकृत होर्डिंगला माझ्या काळात परवानगी दिली गेलेली नाही, असं म्हणत हात वर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या 14 नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेची परवानगी नाही : या दुर्घटनेनंतर पालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतक्या मोठ्या होर्डिंगला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर पालिकेनं हे होर्डिंग रेल्वे पोलीस विभागाच्या मालमत्तेत असल्याचं जाहीर केलं. यासोबतच या होर्डिंगसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही परवानगी दिलेली नाही. या होर्डिंगसाठी रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिलेली असल्याचं महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलं. एकंदरीतच यातून महानगरपालिकेनं हे सर्व प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडं ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारीच 'इगो मीडिया'ला अनधिकृत होर्डिंगबाबत पालिकेनं नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पालिकेनं संबंधित कंपनीकडून 6 कोटी 13 लाख 84 हजार 464 रुपयांचा दंड देखील आकारलाय.
उच्च न्यायालयानं टोचले पालिकेचे कान : याआधी देखील मुंबईतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टरचा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयानं पालिकेचे कान टोचले आहेत. तरी देखील मुंबईतील अनधिकृत होर्डिंग कमी झालेली नाहीत. मुंबईतील अनधिकृत होर्डिंगबाबत मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशाच याचिकेच्या सुनावणीवेळी मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय तसंच न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं पालिकेला फटकारलं होतं. याच सुनावणी दरम्यान न्यायालयानं पालिकेला सार्वजनिक ठिकाणी लावलेली बेकायदेशीर बॅनर, पोस्टर्स, फलक तातडीनं हटवण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी पालिकेच्या निष्क्रियतेच्या तक्रारीवर सरन्यायाधीश डी के उपाध्याय यांनी आम्हाला पालिकेत बसवा, असा उपहासात्मक टोला देखील लगावला होता. सोबतच होर्डिंगसाठी नेमलेल्या जागांची व्यापकपणे प्रसिद्धी करण्यास सांगितलं होतं.
होर्डिंगमधून पालिकेला 97 कोटीचं उत्पन्न : याबाबत ईटीव्हीशी बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लायसेन्स डिपार्टमेंटचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, 'बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 328 अन्वये मुंबईत पालिकेच्या जागेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची असल्यास त्याची पूर्वकल्पना बृहन्मुंबई महानगरपालिकेला द्यावी लागते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुमची जाहिरात लावायची असेल, तर त्यासाठी पालिका करार करत संबंधित जाहिरातीसाठी परवानगी देते. होर्डिंगच्या साईज नुसार पालिकेचे दर ठरलेले आहेत. याच जाहिरातींमधून पालिकेला दरवर्षी 97 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. आजच्या घडीला मुंबईमध्ये 1 हजार 25 अधिकृत होर्डिंग आहेत.