नागपूर -विधान परिषदेचे सभापती भाजपाच्या राम शिंदेंची एकमतानं निवड झालीय. विशेष म्हणजे विरोधी पक्षानंही राम शिंदेंच्या नावाला पाठिंबा दिलाय. आपली कारकीर्द येत्या काळात चांगली आणि राज्याच्या प्रगतीची जावो. तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नवोनिर्वाचित सभापती राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिलंय.
संसदीय लोकशाहीची व्यवस्था जनतेपर्यंत अधिकाधिक उत्तरदायी :विशेष म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केलंय. संसदीय लोकशाहीची व्यवस्था जनतेपर्यंत अधिकाधिक उत्तरदायी व्हावी, यासाठी प्रश्नोत्तराचा तास आणि त्यांचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेंनी सभागृहात व्यक्त केलंय. कोणताही कायदा निर्मितीत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा, त्यामुळे महत्त्वाचे विधेयक विनाचर्चेने संमत होऊ नये, त्यादृष्टीने कार्यवाही करू यात, असे सांगून सभापती राम शिंदे यांनी सर्वांनी जबाबदारीचे वर्तन राखावं, असं आवाहन केलंय. तसेच सभापती म्हणून माझी निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केलेत.
दोन्ही सभागृहांमध्ये विधान परिषदेचा सभापतींचा मान मोठा : दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सभापतीपदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानलेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले पायंडे तयार करणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असून, आपण ती योग्यरीत्या पार पाडाल आणि आम्हाला शिस्त लावाल, अशा विश्वास व्यक्त केलाय. तसेच अहिल्याबाई होळकर आणि माणकोजी शिंदे यांचा 9 व्या पिढीचा वारसा असूनही सभापती म्हणून आपली झालेली निवड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा 300 व्या जयंती निमित्त वाहिलेली श्रद्धांजली असल्याचे मी समजतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सभापती हा कोणत्याही पक्षाचा नसतो. दोन्ही सभागृहांमध्ये विधान परिषदेचा सभापतींचा मान मोठा असतो, त्यामुळे सभापती म्हणून राज्यातील 14 कोटी जनतेला आपण न्याय द्याल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलीय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी इतिहासात जो बाणा दाखविला होता, त्याच बाण्यानुसार आपण काम कराल, असे मला वाटत असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.