सातारा-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या हत्या प्रकरणातील संशयिताच्या 'कराड' आडनावामुळं साताऱ्यातील यशवंतप्रेमी अस्वस्थ झालेत. आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांची कर्मभूमी बदनाम होत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केलीय. आरोपी वाल्मिक कराडचा आणि यशवंतरावांच्या कर्मभूमीचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे कराडला बदनाम करू नका, असं आवाहन कराडमधील यशवंतप्रेमींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नेटकऱ्यांना केलंय.
यशवंतरावांचं 'कराड' सुसंस्कृत :मस्साजोग सरपंचाच्या हत्येनंतर कराड हे नाव प्रसार माध्यमं, सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. तेव्हापासून कराड शहर आणि तालुक्यात 'कराड' नावावर एक वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. नेटकऱ्यांमध्येसुद्धा वाल्मिक कराड हे एकच नाव चर्चेत आहे. परंतु वाल्मिक कराड हा त्या घटनेतील एक संशयित आरोपी आहे. त्या कराडचा आणि आपल्या कराड शहराचा काहीही संबंध नाही. आपलं 'कराड' हे सुसंस्कृत आहे. आरोपीच्या आडनावामुळं यशवंतरावांचं कराड बदनाम होऊ नये, याची काळजी नेटकऱ्यांनी घ्यावी, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटलांनी केलं.
आमचं कराड हिमालयाच्या मदतीला धावलेलं :देशाच्या संरक्षणासाठी हिमालयाच्या मदतीला धावून गेलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचं हे कराड आहे. राजकीय संस्कृती कशी असावी, राजकारणात कसं काम करावं, याचं उदाहरण त्यांनी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसमोर ठेवलंय. त्यांचं कराड हे वाल्मिक कराडच्या नादात बदनाम होऊ नये, याची काळजी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांनी घ्यावी, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. दीपक थोरात यांनी केलंय.