मुंबई BMC Water Supply :देशाची आर्थिक राजधानी पाणी संकटात असल्याच्या बातम्या ईटीव्ही भारतने यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, प्रत्येकवेळी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईत पाण्याची कमतरता नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. तसंच राज्य सरकार अतिरिक्त पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती उत्तर पालिका अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देण्यात आली. मात्र, आता अखेर पालिका प्रशासनानं मुंबईत पाण्याची कमतरता असल्याचं मान्य केलंय. तसंच 31 जुलैपर्यंत मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय. यासंदर्भात महानगरपालिकेनं प्रसिध्दीपत्रक काढलं असून, यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे कशा पद्धतीनं नियोजन केलंय, याची माहिती देण्यात आलीय.
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गत वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनानं यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे 31 जुलै 2024 पर्यंत पुरेल, अशा रीतीनं उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन केलंय. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी करु नये. असं असलं तरी, सर्वांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील आजघडीला उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत आज (7 मे) आढावा बैठक झाली. या बैठकीत पुढील दोन महिन्यात पाणीपुरवठ्याचे कशा पद्धतीनं नियोजन करायचे यावर चर्चा झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून आजघडीला 2 लाख 38 हजार 552 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा 16.48 टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून 1,37,000 दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 31 जुलैपर्यंत पाणी पुरेल, असं नियोजन प्रशासनानं केलंय.