मुंबई :कुर्ल्यामधील बेस्ट बसच्या अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना ताजी असतानाच आता मुंबईत धक्कादायक अपघात झाला आहे. वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाजवळ हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. गाडीखाली चिरडून रस्त्यावर खेळणाऱ्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आयुष लक्ष्मण किनवडे असं या मुलाचं नाव आहे. आयुष हा त्याच्या कुटुंबीयांसह तेथील फुटपाथवर राहात होता. खेळता खेळता रस्त्यावर आल्यानं तो वाहनाच्या चाकाखाली आला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतलं आहे. वाहन चालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.
चालकाच्या निष्काळजीपणामुळं अपघात :अपघातानंतर आरोपी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. मृत मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आणि आरोपी वाहनचालक गोळेच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. वाहनचालक गोळे हा विलेपार्ले येथील रहिवासी आहे. अपघातापूर्वी तो कुठे कुठे गेला होता? तो दारुच्या नशेत होता का? याबाबत माहिती घेतली जात आहे. याबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.