पंढरपूर Vitthal Rukmini Mandir : पंढरपूरयेथील विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन (Pandharpur Padasparsha Darshan) आज पासून सुरू झाल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पदस्पर्श दर्शनाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. याचा पंढरपूरच्या अर्थकारणावर चांगला परिणाम होणार असल्याचं दिसतंय.
महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला झाली सुरुवात :15 मार्चपासून विठ्ठल मंदिरमध्ये जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच मूळ रुप देण्यासाठी मंदिरात काम सुरू होतं. आज पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची नित्य महापूजा पार पडली. या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळीही उपस्थित होते. यावेळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.