साताराVishal Agarwal : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दारूच्या नशेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिलाय. अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत 15 खोल्या जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईमुळं महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे.
प्रशासनानं हॉटेल केलं होतं सील :महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं अनधिकृत हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानं सील केलं होतं. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनानं हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. सकाळी दहापर्यंत प्रशासनानं हॉटेलच्या अनधिकृत १५ खोल्यांचं बांधकाम तोडकामाची कारवाई पूर्ण केली. यावेळी प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश : बिल्डर विशाल अग्रवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनानं तपासणी केली असता हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर हॉटेल, बार आणि अनाधिकृत बांधकाम प्रकरणी संपूर्ण हॉटेलच सील करण्यात आलं होतं. आज अनाधिकृत बांधकामही पाडण्यात आलं.