पुणे : Baramati Lok Sabha : लवकरच लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होईल अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. अशी परिस्थिती असताना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेली नसल्याची चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीत बिघाडी पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज बैठक घेत बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर, आता शिवतारे यांचं आम्ही डिपॉझिट जप्त करू अस थेट चॅलेंज अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिलं आहे. आज सासवडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या अपक्ष उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. आता बारामतीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'उर्मट माणसाचा पराभव करायचा आहे' : यावेळी शिवतारे म्हणाले की, आज आम्ही एकमताने बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत एकमताने ठराव करण्यात आला आहे. अजित पवार यांनी सभ्येतीची नीच पातळी गाठली आहे. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो आणि गाव निर्माण करायला अनेक हात लागतात तशी परिस्थिती इथं निर्माण झालीये असंही शिवतारे म्हणाले आहेत. आपल्याला एका उर्मट माणसाचा पराभव करायचा आहे. या लढाईतला रामाच्या बरोबर असलेला बिभीषण विजय शिवतारे आहे, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.
'दोन्ही पवारांना एकदाच पाडण्याची संधी' : मी महायुतीच्या विरोधात नाही. तिसऱ्यांदा मोदींच्या हातात देश दिला पाहिजे. या मताचा मी आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी गुरू मानतो. नमो विचार मंच या बॅनरखाली ही निवडणूक होईल. हे बंड नाही तर ही न्यायाची लढाई आहे. अजित पवार हे महायुतीत आल्यावर मी अजित पवार यांना भेटलो. त्यांचा सत्कारपण केला. पण त्यांचा उर्मटपणा कमी झालेला नाही. आज पवार विरोधात साडेपाच लाख मतदार आहेत. त्यांना कोणत्याच पवारांना मतदान करायचं नाही. त्यांना माझा पर्याय असेल. एका बाजूला वाघ आहे, एका बाजूला लांडगा आहे असं म्हणत शिवतारेंनी दोन्ही पवारांवर जोरदार टीका केलीये. तसंच, दोन्ही पवारांना एकदाच पाडण्याची संधी असल्याचंही शिवतारे म्हणालेत.
त्यांचं डिपॉझिटच जप्त करू : यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, लोकशाही असून कोणी लढावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. शिवतारे यांना 2019 मध्येच दादांनी सांगितलं होत की, निवडून कसा येतो बघतोच. आता जर ते अपक्ष उभे राहात असतील तर दुपटीने म्हणजेच त्यांचं डिपॉझिटच जप्त करू असं थेट चॅलेंज पाटील यांनी शिवतारे यांना दिलं आहे. दरम्यान, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष पाहता महायुतीत ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळतंय.