शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे पुणे Ajit Pawar Vs Vijay Shivtare : लोकसभा निवडणूक 2024 जाहीर होणार असून लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार असतानाच महायुतीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दोन दिवसांपूर्वी आपण अपक्ष लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे हे अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपडून उभे आहेत. "अजित पवार यांच्याविरोधात तिसरा पर्याय देणार," असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केला आहे.
विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट :शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर विजय शिवतारे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, की "गुरुवारी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, याची माहिती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. नागरिक अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे नागरिकांना मतदानाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्न केला," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
'अजित पवारांसारखी प्रवृत्ती वाढता कामा नये' :"अजित पवार यांच्यासारखी प्रवृत्ती वाढता कामा नये. आज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्या निवडणुकीच्या वेळी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. म्हणून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. बारामती मतदार संघातील नागरिकांना तिसरा पर्याय देणार," असं यावेळी विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून करायचं का मतदान? :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विजय शिवतारे यांची गुरुवारी बैठक देखील झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून महायुती सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विजय शिवतारे यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "याबाबत महायुतीचे नेते हे विचार करतील. त्या अजित पवार यांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का? उद्या ते म्हणतील अजित पवारांचा शिपाई आहे, त्याला देखील मतदान करा. हे लोकशाहीमध्ये चालणार नाही. पूर्णपणे घराणेशाही ही संपली पाहिजे," असंही यावेळी विजय शिवतारे म्हणाले.
हेही वाचा :
- Ajit Pawar News : 'यशवंतरावांच्या आदर्शानुसार वाटचाल करताना अशा गोष्टी...', अजितदादांनी वाचाळवीरांना फटकारलं
- 'दादां'ना पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची फिरकी
- Ajit Pawar : अजित पवारांना डॅमेज करण्यासाठीच महाविकास आघाडीची खेळी, राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीवर पलटवार