छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : सरकार ओबीसी आणि मराठा या दोघांनाही फसवतेय, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तसंच मनोज जरांगे यांनी मागणी केल्यावर देखील सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं मराठा समाजाला न्याय मिळू शकलेला नाही. जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पाच नातेवाईकांचे प्रमाणपत्र सादर केल्यावर एखाद्याला जात प्रमाणपत्र मिळतं, त्यात काही नवीन नाही. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे असाही आरोप अंबादास दानवेंनी केलाय.
अशानं राज्य अधोगतीला जाईल : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होतोय. त्यात राजकीय नेत्यांनी आपली भाषा सांभाळून वापरली पाहिजे. लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हिंसा, गावबंदी करणं हे चुकीचं आहे. राजकीय नेत्यांनी जातीय द्वेष होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. असं केल्यास जनमत आंदोलकांच्या विरोधात जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे. राज्यात सरकारच आंदोलन पेटवत आहे. मराठा समाजाचं आंदोलन केलं, नंतर ओबीसी समाज आंदोलन करतात. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या विचारांचा आहे. इथं असा जातिवाद माजला तर राज्य अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्य घेतात, आपणच असं वागलो तर कसं होईल असं देखील त्यांनी सांगितलं.