महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक, दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय, यामिनी जाधव यांचा तब्बल 54 हजार मतांनी पराभव - South Mumbai Lok sabha Election results - SOUTH MUMBAI LOK SABHA ELECTION RESULTS

South Mumbai Lok sabha Election results : दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा तब्बल 54 हजार मतांनी पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केलीय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 5:43 PM IST

मुंबईSouth Mumbai Lok sabha Election results : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. (Lok Sabha Election Results 2024) अरविंद सावंत यांनी यावेळी देखील विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केलाय. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं आम्ही जिंकत असल्याचा आरोप सातत्यानं होत होता. आज मी उद्धव ठाकरेंमुळं जिंकलोय, याचा मला खूप आनंद आहे. मोदींचं नाव न घेता आम्ही जिंकलो, याचा मला जास्त आनंद आहे', असं अरविंद सावंत यांनी विजयानंतर सांगितलं. 2014 तसंच 2019 मध्ये या मतदारसंघातून अरविंद सावंत निवडून आले होते.

असा आहे मतदारसंघ : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. मुंबईत सहा मतदारसंघ असले, तरी संपूर्ण मुंबईची ओळख दाखवणारा मतदारसंघ अशी या दक्षिण मुंबई मतदारसंघाची ओळख आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या मतदारसंघात जगप्रसिद्ध 'गेटवे ऑफ इंडिया', ताज हॉटेल, महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणजे मंत्रालय, रिझर्व्ह बँक, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत. तसंच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मनपाचं मुख्यालय म्हणजे मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघात आहे. तसंच उच्चभ्रुंचा मलबार हील म्हणजे सर्व प्रशासक, शासक, राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, धनाढ्यांची निवासस्थानं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, महत्त्वाच्या शाखा, अनेक ऐतिहासिक इमारती या भागात आहेत. इतकंच नव्हे तर या कंपन्या आपला करही इथूनच भरतात. इथं मुंबईचे आद्य निवासी कोळ्यांची घरंही आहेत. नौदलाचं केंद्र तसंच बंदरही आहे. त्याचप्रमाणं या मतदारसंघात ऐतिहासिक एलिफंटा येथील लेण्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथं येतात. या लोकसभा मतदारसंघात 400 वर्षे जुनं प्राचीन मुंबादेवीचं मंदिरही आहे. मुंबादेवीच्याच नावावरुन या शहराचं मुंबई हे नाव सर्वार्थाने रुढ झालं. या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे दररोज दिवसाच्या काळात या मतदारसंघाची लोकसंख्या कितीतरी लाखांनी वाढतेय. मुंबई शहर, उपनगर, सर्व मुंबई महानगर क्षेत्रातून इथं दररोज लाखो लोक नोकरी-व्यवसायासाठी येतात. थोडक्यात काय तर या सर्व प्रदेशातील लोकांचं रोजगाराचं केंद्र या भागात आहे.

अरविंद सावंत यांची हॅट्ट्रीक :मुंबईच्या मूळ बेटांपैंकी कुलाबा, लिटल कुलाबा, बॉम्बे, माझगाव, वरळी या बेटांवर पसरलेल्या या मतदारसंघाचा इतिहासही या मतदारसंघासारखाचं रंजक आहे. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातही निवडणुका झाल्या. 1952 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे स. का. पाटील या मतदारसंघाचे पहिले खासदार होते. त्यानंतर 1957, 1962 सालीही मतदारांनी त्यांनाच संधी दिली. नंतर मात्र 1967 साली संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे नेते जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर 1971 साली कैलाश नारायण शिवनारायण काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढं 1977 साली आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टीच्या काळात जनता पार्टीचे रतनसिंह राजदा विजयी झाले होते. त्यानंतर मात्र, दक्षिण मुंबईत मुरली देवरा यांचं युग सुरु झालं. त्यांनी या मतदारसंघावर कित्येक वर्ष आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित ठेवलं होतं. त्यांनी 1984,1989,1991 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर मात्र 1996 च्या निवडणुकीत भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी मुरली देवरांच्या या किल्ल्याला सुरंग लावला. नंतर दोनच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत म्हणजे 1998 साली पुन्हा मुरली देवरा विजयी झाले. तर 1999च्या निवडणुकीत जयवंतीबेन मेहता पुन्हा एकदा लोकसभेत गेल्या. नंतर मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. त्यानंतर 2014 आणि 2019 या दोन निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. 2014 मध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा सामना काँग्रेसच्या मिलिंद देवरांशी झाला होता. या निवडणुकीत अरविंद सावंत 1 लाख 28 हजार 568 मतांनी विजयी झाले. त्यांना 3 लाख 74 हजार 609 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 2 लाख 46 हजार 45 मतं मिळाली. तसंच 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद यांना 4 लाख 21 हजार 937 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 3 लाख 21 हजार 870 मतं मिळाली होती. अरविंद सावंत यांनी ही निवडणूक 1 लाख 67 मतांनी जिंकली होती. या निवडणुकीतही ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटानं भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी होती.मात्र, अरविंद सावत यांनी जाधव यांच्यावर मात करत विजय संपादन केलाय.

कोण आहेत यामिनी जाधव : पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहे. यशवंत जाधव हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. मात्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरु झाली. विशष म्हणजे यात आयकर विभागाची त्यांच्या घरावर धाडही पडली होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं त्यांच्यामागे लागलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबला. यामिनी जाधव यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिलाय. मुंबई महापालिकेत 2012 मध्ये त्या शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम करत आपली छाप उमटवली. ज्या भागातून त्या येतात तो भायखळा विधानसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. त्यामुळं 2014 सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांनी विजय मिळवला होता. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावर भगवा फडकवायचा, असा चंग बांधलेल्या शिवसेनेनं यामिनी जाधव यांना तिकीट दिलं होतं. यामिनी जाधव यांनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत वारिस पठाण यांना पराभूत करून विधानसभेत प्रवेश केला.

सावतं यांचा प्रवास : आता यामिनी जाधव यांच्याविरोधात मैदानात असलेले ठाकरेंचे अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. सुमारे 50 वर्षांपासून शिवसेनेत काम करणारे अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून स्थान मिळवलंय. शिवसेनेत झालेल्या बंडानंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. उत्तम भाषणकौशल्य असलेल्या अरविंद सावंत यांनी महानगर टेलिफोन निगम कर्मचारी संघटनेचं नेतृत्वही केलंय. त्यांचं काम आणि निष्ठा बघून पक्षानं त्यांना 1996 मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर 2010 मध्ये त्यांची शिवसेना प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सावंत मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं निवडणूक रिंगणात उतरवलं. शिवसेनेच्या तिकिटावर 2014 आणि 2019 ला सावंत खासदार म्हणून निवडून आले. तसंच मोदी 2.0 सरकारमध्ये त्यांनी साडेपाच महिन्यांसाठी अवजड उद्योग मंत्रालयाच्या मंत्रिपदी कामही केलंय. त्यामुळं लोकसभा निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव अरविंद सावंत यांना असला, तरी या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती, त्याला कारण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसच्या देवरा कुटुंबीयांचा वरचष्मा राहिला आहे. लोकसभेच्या सहा निवडणुकांत नागरिकांनी देवरा कुटुंबातील सदस्याला खासदार म्हणून संसदेत पाठवलंय. त्यातच या निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, तसंच ते आता राज्यसभेचे खासदारही आहेत.

यामिनी जाधव यांना फटका : हा मतदारसंघ संमिश्र असला, तरी या मतदारसंघात 45 ते 50 टक्यादरम्यान मराठी मतं आहेत. तसंच या मतदारसंघात मनसे फॅक्टर देखील महत्वाचा ठरतो. कारण मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर या भागातून आधी आमदार होते. त्यामुळं त्यांना प्रामुख्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. यासोबतच बाळा नांदगावकर यांचे व्यक्तिगत संबंध मतदारांशी तर आहेतच, पण शिवसेनेसह इतर पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे संबंध चांगले आहेत. तसंच या निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं मनसेची मतं यामिनी जाधव यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू होती. सोबतच यामिनी जाधव यांचा मतदारसंघातील दलित, मुस्लिम मतांवरही चांगली पकड आहे. मात्र, महाविकास आघाडीमुळं ही मतं एकगठ्ठा यामिनी जाधव यांना पडल्याचं दिसत नाहीय. तसंच या मतदारसंघात गुजराती-मारवाडी समाजाची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांची भूमिकाही महत्त्वाची होती. लोढा यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक आहेत. लोढा यांना या मतदारसंघातून खासदारकी लढवायची इच्छा होती. मात्र त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. लोढा यांच्याप्रमाणेच भाजपा आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हेसुद्धा दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मतदारसंघ स्वतःच्या पक्षाच्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले होते.

सहा विधानसभा मतदारसंघ :आता या मतदारसंघाचा भौदोलिकदृष्ट्या विचार केला तर या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा हे मतदारसंघ आहेत. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत. तसंच कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचेच राहुल नार्वेकर करतात, ते विधानसभेचे अध्यक्षही आहेत. तर भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव याच आमदार आहेत. आता त्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत. शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत. तसंच स्वत: आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतो. आदित्य ठाकरेंसोबत अजय चौधरी देखील ठाकरे गटात आहेत. काँग्रेसचे अमिन पटेलही मुंबादेवीतून आमदार आहेत. पण स्वत: यामिनी जाधव यांचा भायखळा, कुलाबा, मलबार हिल हे महायुतीकडे आहेत. त्यामुळं विधानसभा मतदारसंघांची ताकद समसमान आहे. आता यामुळं आगामी निवडणुकीत केंद्रीय मंत्री पदी राहिलेले अरविंद सावंत आपली खासदारकीची हॅट्रिक करतात की, पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याऱ्या यामिनी जाधव बाजी मारतात, तुम्हाला काय वाटतं?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष - 2019 : अरविंद सावंत (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.64% मतं

वर्ष - 2014 : अरविंद सावंत (विजयी उमेदवार- शिवसेना) 48.04% मतं

वर्ष - 2009 : मिलिंद देवरा (विजयी उमेदवार- काँग्रेस) 42.46% मतं

वर्ष - 2004 : मिलिंद देवरा (विजयी उमेदवार- काँग्रेस) 50.28% मतं

वर्ष - 1999 : जयवंती मेहता (विजयी उमेदवार- भाजप) 47.84% मतं

हे वाचलंत का :

  1. मशाल पेटली! भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024
  2. रावेर लोकसभा निकाल 2024 : रक्षा खडसे की श्रीराम पाटील? कोण मारणार बाजी? - Raver Lok Sabha Election Results
  3. जळगावच्या मतदारांची पुन्हा मोदींना साथ, स्मिता वाघ यांना निर्णायक विजयी आघाडी - Jalgaon Lok Sabha Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details