महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं निधन - ANANT BHAVE PASSED AWAY

ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं रविवारी निधन झालं.

Anant Bhave passed Away
अनंत भावे यांचं निधन (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2025, 9:26 PM IST

Updated : Feb 23, 2025, 10:15 PM IST

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं रविवारी निधन झालं. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं. जनमानसामध्ये 'अँकर' हा शब्द रूढ झालेला नसतानाचा काळ. तेव्हा होते वृत्तनिवेदक तेव्हा होते फक्त 'वृत्त निवेदक'. वृत्त निवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गज्जांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. चित्रपटांव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी 'दूरदर्शन' हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होतं. छोटा पडदा म्हणजे 'दूरदर्शन' - दूरदर्शन म्हणजे बातम्या- बातम्या म्हणजे अनंत भावे, असं समीकरण. "नमस्कार. आजच्या ठळक बातम्या" अनंत भावे यांनी म्हणताक्षणीच प्रेक्षक बातम्यांसाठी सरसावून बसायचे.

अनंत भावे यांची वैशिष्ट्यं : अनंत भावे, प्रदीप भिडे, वासंती वर्तक ही वृत्तनिवेदक मंडळी प्रेक्षकांच्या जणू कुटुंबाचा एक भाग बनून गेली होती. प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्ट्यं होती. धीर गंभीर आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि 'दाढी' ही अनंत भावे यांची वैशिष्ट्यं. अनंत भावे यांच्या दाढीवर अनेक विनोदही झाले होते. मुख्य म्हणजे आपल्या दाढीवरच्या विनोदांना अनंत भावे अतिशय मनमुराद दाद देत.

अतिशय उत्तम आणि दर्जेदार वृत्तनिवेदक असलेले अनंत भावे हे सकस साहित्य लिहिणारे साहित्यिकही होते. स्तंभलेखक म्हणूनही ते नावाजले गेले. बालवाङ्मयासाठी तर त्यांनी अतिशय मोठं योगदान दिलं.

प्रसिद्ध बालवाङ्‌मय आणि बालकविता :अनंत भावे यांनी अनेक बालवाङ्‌मय, बालकविता लिहिल्या आहेत. 'अग्गड हत्ती तग्गड बंब','अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी', 'अब्दुल गब्दुल', 'अश्शी सुट्टी सुरेख बाई!', 'उथ्थाप्पाचे उंदीर', 'कासव चाले हळू हळू', 'गरागरा गरागरा', 'गारगोटी झाली आकाशचांदणी', 'गिरकी घेऊन कबुतर सांगतंय', 'घसरगुंडी पसरगुंडी', 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक', 'चला खाऊ पाणीपुरी', 'चिमणे चिमणे', 'चेंडूच्या फिरक्या' असे विविध प्रसिद्ध बालवाङ्‌मय आणि बालकविता अनंत भावे यांनी लिहिल्या.

लिखाणाची शैली 'निर्विश' :पत्रकार, लेखक म्हणून ते अतिशय सजग होते. कुणावरही टीका करताना ते भीड बाळगत नसत. मात्र त्यांची लिखाणाची शैली 'निर्विश' होती. साधा झब्बा, पायजमा, खांद्यावर शबनम झोळी अशा अवतारातले अनंत भावे कोणत्याही साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमात दिसले तर पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआप त्याच्याकडे वळत असत. आई-बाबा 70 आणि 80 च्या दशकातल्या अनंत भावे यांच्या ग्लॅमरबद्दल आपल्या मुलांना सांगत असत. असं अनेकदा घडलं आहे.

साहित्य क्षेत्राचा एक चिरा ढासळला : समाजसेविका, प्राध्यापिका पुष्पा भावे या अनंत भावे यांच्या पत्नी. २०२० साली पुष्पा भावे यांच्या निधनानंतर अनंत भावे यांचा सामाजिक कार्यक्रमांमधला वावर कमी झाला. गेली काही वर्ष ते पुणे येथील आपल्या निवासस्थानी पुस्तकांच्या सहवासात रहात होते. अनंत भावे यांच्या निधनामुळे माध्यम आणि साहित्य क्षेत्राचा आणखी एक चिरा ढासळला आहे.

स्तंभलेखन करायचे :अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक, पत्रकार आणि वक्ते होते. श्री.ग. माजगावकर यांच्या 'माणूस' साप्ताहिकात ते स्तंभलेखन करायचे. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद झालं. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद झाला होता. तसंच भावे यांचे बरेच बालवाङ्‌मय प्रसिद्ध आहेत. दैनिक महानगरमधील त्यांचं 'वडापाव' सदर गाजलं होतं.

'बालसाहित्याचा पुरस्कार' जाहीर : अनंत भावे यांची मुलांशी साहित्यातून संवाद साधणारे भावेकाका अशी ओळख होती. भारतीय भाषांमध्ये साहित्य निर्मिती करणाऱया साहित्य अकादमीतर्फे त्यांना 'बालसाहित्याचा पुरस्कार' जाहीर झाला होता. 'उच्चकपाचक अंदाजपंचे' हा कवितासंग्रह लोकप्रिय ठरला होता तसेच 'एक झाड लावू मित्रा' ही कविता चिमुकल्यांना भावणारी होती.

हेही वाचा -

  1. प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांचं निधन, राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
  2. साप्ताहिक 'मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे निधन, आज दुपारी होणार अंतिम संस्कार
  3. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन, संभाजीनगरातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Last Updated : Feb 23, 2025, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details