ठाणे Thane News :पावसाळ्याच्या दिवसांत सापांच्या बिळात पाणी शिरल्यानं विषारी-बिन विषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसात कल्याण पश्चिम भागातील विविध मानवी वस्त्यामध्ये विषारी आणि बिनविषारी साप शिरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण पश्चिम उंबर्डे गावातील एका ग्रामस्थाच्या पाळीव बदकाच्या पिंजऱ्यात भलामोठा साप घुसून त्यानं बदकाची पिल्लं भक्ष्य केली होती. तर दोन हरणटोळ जातीचे (हिरवेगार) सापही याच गावातील मानवी वस्तीतून पकडण्यात आले आहेत.
वाडेघर गावातून डुरक्या घोणस जातीचा साप तर रोनक सिटी भागातून दिवड जातीचे 2 भलेमोठे साप सर्पमित्र दत्ता यांनी पकडली. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. तसंच एका घराच्या पडवीत कोब्रा नाग शिरल्याची घटना शनिवारी (22 जून) घडली. या कोब्रा नागाला पाहून संपूर्ण कुटूंब भयभीत होऊन घराबाहेर पळाले होते. मात्र सर्पमित्र दत्ता यांनी या नागाला शिताफीनं पकडून पिशवीत बंद केल्यानं त्या कुटुंबानं सुटकेचा निश्वास घेतला. तर इतर भागातूनही धामण जातीचे बिनविषारी भलेमोठे तीन साप पकडण्यात आले. तीन दिवसात डझनभर विषारी- बिन विषारी सापांना वस्तीतून सर्पमित्र दत्ता यांनी पकडले.