बीड Prakash Ambedkar Slams Sharad Pawar : "कोण पाकिस्तान बरोबर आहे आणि कोण पाकिस्तान बरोबर नाही, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. मुंबईतला प्रचार ज्यावेळेस सुरु होईल, त्यावेळेस या सर्व गोष्टीची उत्तरं त्यांना द्यावी लागतील," असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. "राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून शरद पवारांनी काय बोलणं झालं, हे सांगावं. मी जर पंतप्रधान मोदींशी बोललो तर लोक वेगळा अर्थ काढतील, असं त्यांना वाटलं असावं. त्यामुळे शरद पवार राजनाथ सिंह यांच्यासोबत काय बोलले? हे त्यांनी सांगावं," असं आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.
संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते ? :यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठा आरोप केला. "औरंगजेबाच्या मजारवरती आम्ही चादर चढवायला गेलो होतो. छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ झाला, त्याला औरंगजेब जबाबदार होता, असा नॅरेटीव्ह सेट करण्यास सुरुवात झाली. मुळात माझं म्हणणं असं आहे, की संभाजी महाराजांना पकडून देणारं कोण होतं ? हे त्यातलं महत्त्वाचं आहे. मी त्यावेळेस हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर औरंगजेबाकडं सजा देणारा हिंदू धर्मातील तो कोण होता ? त्याचं देखील नाव मी दिलं आहे. संभाजी महाराज यांचं वेदांमध्ये प्रावीण्य होतं. त्या काळात वेदांमध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाची कशा तऱ्हेनं हत्या करावी ? कशाप्रकारे छळ करावा ? हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. जे कोणी प्रचार करतात, त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, संभाजी महाराजांवर झालेला अत्याचार आणि मनुस्मृतीमध्ये दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर त्यांनी प्रचार करावा."
चोराच्या मनामध्ये चांदणं : "घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आरक्षण जाणार नाही, जे सांगतात हे चुकीचं आहे. जर घटना बदलणार अशी चर्चा सुरू झाली नसती, तर आरक्षणाची चर्चा झाली नसती. त्यामुळे आम्ही घटना बदलणार आहोत किंवा नाही याविषयीचा खुलासा अजूनही पंतप्रधानांनी केला नाही. त्यामुळे ज्याला टॉसिंग म्हणतो त्या पद्धतीनं या विषयाला पंतप्रधान टॉसिंग करतात, बाकी काही नाही."