महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मातोश्रीच्या अंगणातील मतदारसंघ परत मिळवण्यासाठी शिवसेनेची धडपड; वांद्रे पूर्व मतदारसंघात कोण मारणार बाजी? - BANDRA EAST CONSTITUENCY

शिवसेनेतर्फे वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी अनिल परबांनी जाहीर केलीय. त्यामुळे या मतदारसंघात सरदेसाई विरोधात विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

Zeeshan Siddiqui and Varun Sardesai
झिशान सिद्दिकी आणि वरुण सरदेसाई (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 6:01 PM IST

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या अंगणातील मतदारसंघ मिळवण्यासाठी आतापासून जोरदार तयारी केलीय. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाचा समावेश असलेला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा, यासाठी शिवसेनेनं रणनीती आखली आहे. शिवसेनेतर्फे वांद्रे मतदारसंघातून युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांची उमेदवारी अनिल परबांनी जाहीर केलीय. त्यामुळे या मतदारसंघात सरदेसाई विरोधात विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.


सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर: मातोश्रीच्या अंगणात असलेल्या या मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांनी विजय मिळवत शिवसेनेला धक्का दिला होता. मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला असून, सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा भावनिक लाभ झिशान यांना किती प्रमाणात मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेला ताबा मिळवायचा आहे.

पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी: २००९ आणि २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रकाश (बाळा) सावंत यांनी विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता. मात्र २०१९ मध्ये तृप्ती सावंत यांना उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे मतविभागणी होऊन शिवसेनेचे उमेदवार आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तसेच झिशान सिद्दिकी यांच्या रूपाने काँग्रेसला २००४ नंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीय.

२०१९ च्या निवडणुकीत कुणाची होती ताकद?:२०१९ च्या निवडणुकीत झिशान सिद्दिकी यांना ३८ हजार ३३७ मते मिळाली आणि ते विजयी झालेत, तर दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना ३२ हजार ५४७ मते मिळाली होती. तृप्ती सावंत यांना २४ हजार ०७१ मते मिळाली. सावंत यांनी एवढी मते मिळवल्याने शिवसेनेला हा मतदारसंघ गमवावा लागला होता. बाबा सिद्दिकी ५७९० मताधिक्याने विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश सावंत यांनी ४५ हजार ६५९ मते मिळवून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनार्दन चांदूरकर यांना ३८ हजार २३९ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना १९ हजार १०९ मते मिळाली होती.

शिवसेनेचे प्रकाश सावंत विजयी : २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश सावंत ४१ हजार ३८८ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यांनी भाजपाच्या कृष्णा पारकर यांचा पराभव केला होता. पारकर यांना २५ हजार ७९१ मते मिळाली होती. या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार राजा रहबर खान २३ हजार ९७६ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते, तर काँग्रेसचे उमेदवार संजीव बागडी यांना १२ हजार २२९ मते मिळाली होती. त्यानंतर आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी ५२ हजार ७११ मते मिळवून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसने उमेदवार असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता. नारायण राणेंना त्यावेळी ३३ हजार ७०३ मते मिळाली होती.

पुनर्रचनेपूर्वीच्या मतदारसंघाचा असा आहे इतिहास?:वांद्रे पूर्व मतदारसंघ २००९ पासून अस्तित्वात आला, त्यापूर्वी हा मतदारसंघ खेरवाडी नावाने ओळखला जात होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रा. जनार्दन चांदूरकर हे १९८५, १९९९ आणि २००४ अशा तीन वेळा विजयी झाले होते. २००४ मध्ये त्यांना ५०१५७ मते मिळाली होती. १९९९ मध्ये त्यांना ३७ हजार ९३६ मते मिळाली होती. तर १९८५ मध्ये ते २४ हजार ०६३ मिळवून विजयी झाले होते. १९९० आणि १९९५ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले होते. १९९० मध्ये त्यांना ४२ हजार ७४२ मते मिळाली होती तर १९९५ मध्ये त्यांना ५४ हजार ९७८ मते मिळाली होती. १९८० मध्ये काँग्रेसचे मेघाजी छेडा विजयी झाले होते, त्यांना २१ हजार ७६५ मते मिळाली होती. तर त्यापूर्वीच्या १९७८ च्या निवडणुकीत रामदास नायक हे ३६ हजार ८५१ मते मिळवून विजयी झाले होते.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश
  2. "दादा न्याय देतील असं वाटलं होतं, पण…", पुणे शहराध्यक्षांनी व्यक्त केली खदखद; घेतला मोठा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details