खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया मुंबई Vanchit Bahujan Aghadi :'वंचित बहुजन आघाडी'चा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अधिकृत समावेश करण्यात आलाय. महाविकास आघाडीनं याबाबतचं अधिकृत पत्र जारी केलंय. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. मागच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत देखील 'वंचित'चं नाराजीनाट्य समोर आलं होतं. तसंच मंगळवारच्या बैठकीतही 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यांना तासभर बाहेर उभं केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अखेर 'वंचित'चा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यात आल्याचं पत्र देण्यात आलंय.
पुढील बैठकीला 'वंचित' जाणार : वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षांना महाविकास आघाडीच्या बैठकीत योग्य आदर दिला नाही. तसंच महाविकास आघाडीमध्ये 'वंचित'चा समावेश केल्याबाबतचं कोणतंही पत्र अजून मिळालेलं नाही. परंत, भाजपा-आरएसएसचा पराभव करणं हे 'वंचित'चं प्राधान्य असल्यानं महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत आम्ही सहभागी होणार आहोत, अशा प्रतिक्रियेची एक पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स'वर शेयर केलीय.
वंचित बहुजन आघाडीचा महविकास आघाडीत समावेश झालाय. प्रकाश आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. 'वंचित'मुळं देशातील हुकूमशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचं संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावं लागेल - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
पत्रात नेमकं काय म्हटलंय : "देश अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडं वळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला महान संविधान दिलं. व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवलं जात आहे. 2024 मध्ये देशात वेगळा निकाल लागला, तर कदाचित ही शेवटची निवडणूक असेल, असा लोकांना संशय आहे. ही परिस्थिती बदलून राज्यात, देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही देशाच्या हुकूमशाहीविरुद्ध लढत आहात. त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापुढं वंचित बहुजन आघाडीनं अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील व्हावं, अशी आमची भूमिका आहे," असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
'वंचित'चा 'मविआ'मध्ये समावेश : महाविकास आघाडीची 25 जानेवारी रोजी मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नसल्यानं नाराजीनाट्य रंगलं होतं. पुढील बैठकीसाठी 'वंचित'ला निमंत्रण दिलं असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. त्यानुसार, मंगळवारी (30 जानेवारी) महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीवेळी 'वंचित'च्या नेत्यांना तासभर बाहेर ठेवल्याचा आरोप करत पुन्हा एकदा नाराजीनाट्य रंगलं होतं. अखेर 'वंचित'ला महाविकास आघाडीमध्ये अधिकृत समावेश करुन घेत असल्याचं पत्रच जारी करण्यात आलंय.
पुढील बैठकीत जागावाटपाबाबत निर्णय : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे उपस्थित होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र वंचितचे नेते या बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आम्हाला अपमानित करण्यात आल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं. मात्र, काहीतरी गैरसमज झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
गैरसमज झाला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बैठकीत सहभागी झाले आणि अचानक ते बैठकीतून बाहेर आले. त्यामुळे 'वंचित' महाविकास आघाडीमध्ये नाराज आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, "कदाचित आपल्यामध्ये काहीतरी गैरसमज झाला असावा. कारण वंचितचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आमच्याबरोबर जेवण केलं. तसेच पुढील बैठकीसाठी त्यांना अधिकृत पत्रही दिले आहे," असं संजय राऊत म्हणाले.
पुढील बैठक 2 फेब्रुवारीला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची या महिन्यातील दुसरी बैठक मंगळवारी झाली. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यासह वंचितला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. महाविकास आघाडीची पुढील बैठक 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावेळी प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
हे वाचलंत का :
- किरीट सोमैयांविरोधात तक्रार द्यायला 5 महिला समोर आल्या, पण घाणेरडं राजकारण आम्ही करणार नाही - संजय राऊत
- विकासाचं विकेंद्रीकरण करणं हा ‘अॅडव्हांटेज विदर्भ’चा उद्देश– नितीन गडकरी
- 'इंडिया'तून नितीश कुमार बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीची आज बैठक, निश्चित होणार का जागावाटपाचा फॉर्म्युला?