ठाणे : दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळं सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे. याच महागाईमध्ये मुंबई-ठाणे उपनगरातील वडापावचा सहभाग आहे. खाद्यतेल कांदा, बटाटा, तसंच मैद्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यानं, वडापाव विक्रेत्यांनी वडापावचे दर दर १ ते २ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एका वडापावला (Vada Pav) १५ ते २० रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. मात्र, यापुढे सर्व सामान्य नागरिकाचं आवडतं खाद्य असलेल्या वडापावच्या चवीला महागाईचा ठसका लागणार आहे.
वडापावच्या किंमतीत १ ते २ रुपयाने वाढ : मुंबई-ठाणे उपनगरत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची सकाळची न्याहारी असो वा दुपार किंवा रात्रीच्या जेवणास पर्याय म्हणून वडापाव खावून पोट भरलं जातं. तर महागाईमुळं बदलापुरातील बेकरी चालकांकडून सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळं बदलापूर शहरात कुठेच पाव मिळाले नाहीत. आधीच बेसन, खाद्यतेल, कांदे-बटाटे, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता मसाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं आता पूर्वीच्या दरात वडापाव विकणे विक्रेत्यांना परवडणार नसल्यानं वडापावच्या किंमतीत १ ते २ रुपयानं वाढ आजपासून करणार असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.