मराठवाड्यासह वऱ्हाडात अवकाळी पावसाची हजेरी छत्रपती संभाजीनगर Unseasonal Rain : राज्यातील बऱ्याचं भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय. त्यामुळं उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं. तसंच अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला असून पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पालोद, रहिमाबाद आणि आनवी परिसरामध्ये सुमारे अर्धा तास झाली गारपीट झाली. त्यामुळं वातावरणात अचानक बदल जाणवला.
अचानक झाली गारपीट : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पालोद, रहिमाबाद, अन्वी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतात उभ्या असलेल्या उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलं. यामुळं शेतकऱ्यांची दाणादाण उडालीय. या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपिटीचा तडाखा बसला. यामुळं मोठ्या प्रमाणात गारांचा खचदेखील साचला होता. यामुळं शेतात उभ्या असलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून पुढचे 2 दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सध्या पशुधनासाठी चारा जमा करण्याची लगबग शेतकऱ्याकडून सुरू होती. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसानं तडाखा दिल्यानं शेतकरी हैराण झालाय.
दोन दिवसांपासून वाढला उकाडा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलीय. एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा चाळीशी पार करत असल्यानं नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतोय. काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असतानाच गुरुवारी दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. जवळपास अर्धातास गारपीट झाल्यानं जागोजागी गारांचा खच जमा झाला होता. गारांच्या माऱ्यामुळं उभ्या पिकांना नुकसान झालंय. विशेषतः कांदा पिकांचं नुकसान अधिक प्रमाणात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आधीच कमी पाण्यानं पीक जगण्याची कसरत करत असलेल्या शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसामुळं पुन्हा अडचण निर्माण झालीय.
अमरावतीतही जोरदार पावसाचा कहर : तिकडे वऱ्हाडातही अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपिटीसह वादळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसलाय. जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. जिल्ह्यात महावितरणला एकूण सव्वा कोटी रुपयांचा फटका बसलाय. वादळामुळं चांदूरबाजार तालुक्यात अनेक ठिकाणी झाडं उनमळून वीज वाहिन्यांवर पडल्यामुळं महावितरणचे 814 वीज खांब कोसळले. यामुळं महावितरणच्या नऊ उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडित झाला. भातकुली तालुक्यात आकाशातील वीज आणि महावितरणची वीज यंत्रणा यांमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन अनेक वीज वाहिन्यांवरील इन्सुलटर फुटले. तसंच उपकेंद्रात तांत्रिक दोष निर्माण झालं. तसंच काही ठिकाणी वादळामुळं झाडं उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली. यामुळं एकूण नऊ उपकेंद्र आणि 37 फिटर पूर्णतः बंद पडले होते.
हेही वाचा :
- अमरावती विभागाला अवकाळी पावसाचा फटका; सात जनावरं दगावली
- बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; ज्वारी,गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान