अमरावती-अमरावतीत संगीतप्रेमी आणि हौशी कलावंतासाठी अनोख्या अशा संगीत मैफीलीचं (unique world record in Amravati) आयोजन करण्यात आलं. साडेपाच हजारांहून अधिक गाणी, कविता आणि दोन-तीन मिनिटांचे नृत्य, अशी मैफील सलग 18 दिवस अमरावती शहरातील अभियंता भवन येथे रंगली. या मैफीलीचा सुखद अनुभव संगीतप्रेमींना घेता आला.
अमरावतीमधील 401 तासांचा संगीत मैफीलीचा विक्रम नोंदविण्यात येणार असल्याचं दिल्लीचे वर्ल्ड रेकॉर्डचे सीईओ पवन सोलंकी यांनी जाहीर केलं. त्यानंतर अभियंता भवन सभागृहात कलावंतांनी जल्लोष केला. यावेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी केप कापून कलावंतांचा उत्साह वाढवला.
अशी रंगली संगीत मैफील-अमरावती शहरातील स्वराज्य एंटरटेनमेंट या हौशी गायकांच्या संस्थेमार्फत सलग गाण्यांचा विक्रम नोंदविण्यासाठी 4 जानेवारीपासून विशेष विक्रमी अभियानाला प्रारंभ झाला. अमरावती शहरातील विविध भागात असणारे हौशी गायक आणि कलावंत या विक्रमात आपला सहभाग नोंदविण्यासाठी समोर आले. सलग 18 दिवसांमध्ये अडीच ते तीन हजार हौशी गायकांनी या मैफीलीत आपल्या गाण्यांनी वातावरण संगीतयम केलं. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील हौशी गायक या मैफीलीत सहभागी झाले. पोलीस खात्यातील अधिकारी, विविध सरकारी विभागातील कर्मचारी, महापालिकेतील उपायुक्त, शिक्षक, जिल्हा परिषदेतील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशा विविध विभागातील कर्मचारी मैफीलीत जमले. आपल्या व्यवसायासोबत गाण्याची कला जोपासणारे अनेक हौशी कलावंत या संगीतमय सोहळ्यात सहभागी झाले.