महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नितीन काकांनी शब्द पाळला'; कोल्हापुरात डॉ नुपूर पाटील यांच्या हॉस्पिटलचं केलं उद्घाटन - NITIN GADKARI ON KOLHAPUR

शब्दाला जागणारे नेते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. नितीन गडकरी यांनी नुपूर पाटील यांना नागपुरात शब्द दिला, तो त्यांनी कोल्हापुरात पूर्ण केला.

Nitin Gadkari On Kolhapur
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2025, 10:28 AM IST

Updated : Feb 18, 2025, 2:32 PM IST

कोल्हापूर : भारतीय राजकारणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडले व्यक्तिमत्व म्हणून देशभर ओळखले जातात. व्यस्त दिनक्रमातूनही अनेक कुटुंबांशी जोडलेले ऋणानुबंध मंत्री नितीन गडकरी मनमुराद जपण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच प्रत्यय कोल्हापुरात आला आहे. नागपूरचे खळतकर कुटुंब आणि गडकरी यांच्यातील जिव्हाळा गेली 45 वर्ष कायम आहे. खळतकर कुटुंबातील डॉ. नुपूर यांनी कोल्हापुरात स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. वैद्यकीय शिक्षण घेत असताना नुपूर यांना मंत्री गडकरी यांनी तुझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला नक्की येईन, असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पूर्ण केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Reporter)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पूर्ण केला शब्द :केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यात गडकरी यांनी नवीन राजवाडा इथं काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापुरातील नागळा पार्क इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या डॉ. राहुल पाटील आणि डॉ. नुपूर पाटील यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. डॉक्टर नुपूर या नागपूरच्या कन्या असून नागपुरातील खळतकर कुटुंबीय यांचे मंत्री नितीन गडकरी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. नुपूर यांनी नागपुरातून वैद्यकीय पदवी घेतली आहे. माध्यमिक, महाविद्यालयीन आणि वैद्यकीय शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला मोलाचा ठरला. माध्यमिक परीक्षेत माझ्या शाळेत मी प्रथम आले, तेव्हाही त्यांनी माझं कौतुक केलं. तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तुझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी नक्की येईल, असा शब्द दिला. तो त्यांनी पाळला, अशा भावना डॉ. नुपूर पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

'नितीन काकांनी शब्द पाळला'; कोल्हापुरात डॉ नुपूर पाटील यांच्या हॉस्पिटलचं केलं उद्घाटन (Reporter)

कोल्हापूरकर आणि नागपूरकर विकासाला हातभार लावू :"डॉ. राहुल पाटील आणि नुपूर पाटील यांनी उभं केलेलं हे हॉस्पिटल कोल्हापूरच्या प्रगतीसाठी योगदान देणारं ठरेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आरोग्य सेवा बळकट होईल," असं मत यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपूरकर डॉ. नुपूर पाटील आणि कोल्हापूरकर डॉ. राहुल पाटील असे आम्ही एकत्र आलो आहोत. आता नागपूर सारखा कोल्हापूरचा सुद्धा विकास होईल. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या प्रत्येक यशामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं योगदान आहे, असं डॉ. नुपूर पाटील यावेळी म्हणाल्या.

कार्यक्रमाला नेत्यांची मांदियाळी :केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार जयंत आसगांवकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. कार्यक्रमात कमांडोला आली अचानक भोवळ; मात्र नितीन गडकरी यांचं भाषण सुरू, पाहा व्हिडिओ
  2. जस्टिस डिलेड मीन्स जस्टिस डीनाईड, नितीन गडकरी असं का म्हणाले?
  3. 'अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ'मध्ये होणार तब्बल 'इतक्या' कोटींचे सामंजस्य करार, नितीन गडकरींनी नेमकं काय सांगितलं?
Last Updated : Feb 18, 2025, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details