मुंबई Sachin Vaze Controversial : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आतापर्यंत त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे; परंतु मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाजे यांनी उडी घेतल्यानं आता हे प्रकरण आणखीनच तापलं आहे. त्यामुळे वाजे यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सचिन वाजे यांची कारकीर्द वादग्रस्त :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात सचिन वाजे यांचं नाव आलं. ते 1990 मध्ये मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीमुळे थोड्या अवधीतच ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून चर्चेत आले. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मुन्ना नेपाली अशा अनेक गँगस्टरच्या गँगमधील सदस्यांचा एन्काऊंटर केला आहे. 2003 मध्ये ख्वाजा युनूस नावाच्या घाटकोपर ब्लास्ट प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणावरून त्यांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आलं. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
प्रदीप शर्माचे शिष्य आहेत सचिन वाजे :मुंबईतील सुप्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे सचिन वाजे यांचे गुरू मानले जातात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सचिन वाजेनं 2007 मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर तब्बल 13 वर्ष शिवसेनेमध्ये काढल्यानंतर 2020 मध्ये ते पुन्हा एकदा पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सचिन वाजे यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता पथकाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. तसंच मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर कारमध्ये स्फोटकं सापडल्यानंतर हे प्रकरण सचिन वाजे यांच्याकडं देण्यात आलं; परंतु त्यानंतर याबाबत अनेक आरोप झाले. त्यामुळे त्यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये वाजेविषयी आक्षेप घेतला.