डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मुंबई Mumbai Railway Stations : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह 'अमृत भारत योजने'च्या माध्यमातून देशभरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. या योजनेंतर्गत मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचं देखील आधुनिकीकरण होणार आहे. सोमवारी (26 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 554 हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे आणि 1500 रोड ओव्हर ब्रीज आणि भुयारी मार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
अमृत भारत योजनेतून 554 कोटींचा निधी : "भारतीय रेल्वेच्या वतीनं 'अमृत भारत योजने'च्या माध्यमातून अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचं काम केलं जाणार आहे," अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली. "महाराष्ट्रातील पाच रेल्वे डिव्हीजनचा यात समावेश आहे. तसंच या कामांमध्ये सुधारित टॉयलेट बॉक्स आणि ड्रेनेज सिस्टीम बसवणं, तिकीट बुकिंग ऑफिस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि छतावरील पत्रांची दुरुस्ती करणे, आसन व्यवस्था आणि पार्किंग क्षेत्र तयार करणे आदी कामांची तरतूद करण्यात येणार आहे," असंही स्वप्निल निला यांनी सांगितलं.
मुंबईत 20 रेल्वे स्थानकांचा समावेश: "महाराष्ट्रातील विविध शहरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यात मुंबईमधील 20 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील 12 स्थानकांचा समावेश आहे, तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे," असं डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितलं. अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये 12 मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील. तसंच हा विकास करताना दिव्यांगांचा देखील विचार केला जणार असून आधुनिक स्वरुपात नव्या रचनेसह स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.
कोणती विकासकामं केली जाणार? : पश्चिम रेल्वे स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर मध्य रेल्वेच्यादेखील 12 स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे. यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाला 260 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या स्थानकांवर आधुनिक बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, विजेचे दिवे, तसंच लिफ्ट देखील बसविल्या जाणार आहे. रेल्वेच्या वेळा दर्शवण्यासाठी आधुनिक डिजीटल बोर्ड, तसंच तिकीटघरांचाही विकास करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
- कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार
- लोकलच्या विविध मार्गांवर आज मेगाब्लॉक, कसं असेल गाड्यांचं वेळापत्रक? वाचा सविस्तर
- ठाण्याजवळ नवीन रेल्वे स्थानक होणार, कामाला मिळणार गती; वाचा कधीपर्यंत होणार प्रवाशांसाठी खुलं?