विरार: वसई-विरार शहरातील रस्ते हे वाहनांच्या अनधिकृत पार्किंगने आणि फेरीवाल्यांनी गजबजत चालले आहेत. यामुळं वाहनचालक आणि सामान्य नागरिकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे. त्यातच वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येऊ शकते. मात्र आठवेळा अर्ज करूनसुद्धा पालिका स्वत:ची टोइंग व्हॅन उपलब्ध करून देत नसल्यानं कारवाईस अडथळा येत असल्याचं वास्तव माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून समोर आलं आहे. त्यामुळं वाहतुकीच्या प्रश्नाबाबत पालिका तथा वाहतूक विभाग गंभीर नसल्याचं दिसून येत आहे.
शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न: शहरातील रस्त्यांवर अनधिकृत वाहन पार्किंगचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि तीन चाकी गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्यावेळी फेलीवाले जागा मिळेल तिथे आपलं बस्थान मांडत आहेत. यामुळं आधीच बेकायदेशीर पार्किंग अरुंद झालेले रस्ते फेरीवाल्यांमुळं पूर्णतः कोंडले जात आहेत. यामुळं शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असून वाहन चालकांना वाहन चालवणं अवघड होत आहे. तर चालण्यासाठी जागाच मिळत नाही. आधीच छोटे रस्ते त्यात वाहनांनी अर्धा व्यापलेला रस्ता त्यामुळं शहरातील रस्त्यावर गाडी चालवावी की नाही असा प्रश्न वाहनचालकांना भेडसावत आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं वसई-विरार महापालिका आणि वाहतूक विभागाच्या उदासीनतेमुळं नागरिकांचे हाल होत आहेत.
टोइंग व्हॅन उपलब्ध नाही : विशेष म्हणजे माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, २०१८ पासून आतापर्यंत वाहतूक विभागानं ८ वेळा महापालिकेकडून टोइंग व्हॅन मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या पत्राच्या उत्तराखातर पालिकेनं कंत्राटदारांकडून टोइंग व्हॅन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अजूनपर्यंत व्हॅन उपलब्ध करून दिली नाही. त्यातच कंत्राटदारांच्या टोइंग व्हॅन वेळप्रसंगी मिळत नसल्यानं कारवाईत अडथळा येत असल्याचं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे.