नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळातील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम महिनाभरात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला होता. मात्र, महिनाभराचा कालावधी पूर्ण होऊन देखील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम आद्यपही अपूर्णच आहे. त्यामुळं आता याप्रकरणी नितीन गडकरी काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
60 टक्के काम पूर्ण : विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम केवळ 60 टक्केचं पूर्ण झालय. तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत मिळावी, अशी मागणी रिकार्पेटिंगचं काम करत असलेल्या के जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं केलीय. मुळात काम वेळेत पूर्ण होण्यासाठी दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 'रन-वे' बंद ठेवण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र, अनेक विमानांचं आकस्मिक उड्डाण आणि लॅडिंगसाठी गेल्या 2 महिन्यात वारंवार काम बंद करावं लागलं. तसंच व्हीव्हीआयपी मुव्हमेंटसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान अनेकवेळा काम बंद करावं लागतं. त्यामुळं रिकार्पेटिंगचं काम वेळेत होऊ शकलं नसल्याचं सांगितलं जातय.
धावपट्टी ते हॉट मिक्स प्लांटचे अंतर अधिक : विमानतळातील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम करण्यासाठी काँक्रीटची आवश्यकता आहे. मात्र, या कामासाठी आवश्यक हॉट मिक्स प्लांट हा धावपट्टीपासून लांब आहे. रिकार्पेटिंगसाठीचं साहित्य आणण्यासाठी देखील बराच वेळ जातो. त्यामुळं आता काम करणाऱ्या कंपनीला अतिरिक्त क्षमतेचा हॉट मिक्स प्लांट सुरू करण्याची परवानगी, देण्यात आली आहे.