छत्रपती संभाजीनगरChandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे आता खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत. चिथावणीखोर भाषा त्यांना शोभत नाही. महाराष्ट्र हे संस्कृती जपणारं राज्य आहे. मात्र, त्यांनी आपली संस्कृती दाखवून दिली आहे. भाजपा काम करणारा पक्ष आहे, असं प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलं.
मानसिक दिवाळखोरी :चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांवरून देवेंद्र फडणवीस यांना बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भाषा ऐकली असती तर त्यांना काय वाटलं असतं, याचा विचार करायला हवा. ते काय बोलत आहेत हे देखील त्यांना कळत नाही. त्यांच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्या भरवशावर उद्धव ठाकरे फडणवीसांना आव्हान देत आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं नेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा व्यक्तीबद्दल उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून त्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून येते. उद्धव ठाकरे आता जाती-धर्माचं राजकारण करू पाहात आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. राज्यातील जनता त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करेल, असंही ते म्हणाले.
विधानसभेला आम्ही सत्य उघड करणार : लोकसभेचा त्यांचा खोटारडेपणा आम्ही समजू शकलो नाही. मात्र आता या मायावी सत्तेच्या कारस्थानात कोणालाही फसू देणार नाही. आता 69 ठिकाणी अधिवेशन घेणार आहोत. 750 तालुका मंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधकांचा खोटारडेपणा उघड करू, जनतेला सत्य सांगू. आज संभाजीनगरमध्ये विधानसभा विस्तारवर्ग आहे. महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात खोट्या प्रचारातून मतं मिळवली. त्यामुळं या खोट्याच्या विरोधात मतदारांना सत्य सांगण्यासाठी सभा घेत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.