महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"तुम्ही किती मर्सिडीज दिल्या?" उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंना सवाल - UDDHAV THACKERAY ON NEELAM GORE

ठाकरेंना मर्सिडीज दिली की मोठी पदं मिळतात, असा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी गोरेंवर जोरदार टीका केली.

UDDHAV THACKERAY ON NEELAM GORE
उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2025, 3:45 PM IST

Updated : Feb 23, 2025, 8:26 PM IST

मुंबई : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत. "ठाकरेंना मर्सिडीज दिली की, मोठी पदं मिळतात," असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल केला. "जाऊ द्या... मी गयेगुजऱ्या लोकांवर बोलत नाही. महिला म्हणून त्यांचा आदर आहे. पण त्यांना आम्ही ४ वेळा आमदार केलं, त्यांनी किती वेळा मर्सिडीज दिल्या?" असा सवाल करत गोऱ्हेंवर टीका केली.

शिवसेनेत प्रवेश :रविवारी मातोश्रीवर अहिल्यानगर इथले काँग्रेसचे जिल्हाप्रमुख किरण काळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. काळे यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

गद्दारांवर मी बोलणार नाही : "आजही निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. शिवसेनेतून गद्दारी करून गेलेल्यांवर मी बोलणार नाही. अनेक ठिकाणाहून आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी शिवसेनेला पत्र येत आहेत. उत्तर प्रदेशमधील शिवसैनिकांनीही पत्र पाठवली आहेत. तिकडेही संघटनात्मक बैठका सुरू आहेत. परंतु, जे शिवसेनेतून गद्दारी करून गेले. त्या गद्दारांवर मी बोलणार नाही. आगामी काळात शिवसेनेत अनेक प्रवेश होणार आहेत," असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? : दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. "ठाकरेंना एक-दोन मर्सिडीज दिल्या की मोठी पदं मिळायची," असा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असताना यावर स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. "जे गद्दारी करून गेलेत त्यांच्यावर मी बोलत नाही. गयेगुजरे लोकांवर मी बोलत नाही. शेवटी त्या एक महिला आहेत. मी त्यांचा आदर करतो. महिला आघाडीचा विरोध असतानाही आम्ही त्यांना चार वेळा आमदार केलं. उपसभापती केलं. मग, त्यांनी आम्हाला आठ मर्सिडीज दिल्या का? किंवा त्यांनी आम्हाला किती मर्सिडीज दिल्या? हे तुम्ही त्यांनाच विचारा." असं म्हणत ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या आरोपांना उत्तर दिलं. "एकीकडं लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं जातं आणि दुसऱ्या महिला मर्सिडीजमधून फिरत आहेत. या मर्सिडीजमधून फिरत असताना लाडक्या बहिणीला मात्र, यांनी उपाशी ठेवले आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे आणि राज्य सरकारवर केली.

आता तरी विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी : "एकीकडं मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय दिलं जात आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला. घोटाळा केला मात्र, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. आता माणिकराव कोकाटे प्रकरणात न्यायालयानं कारवाईचे आदेश विधानसभा अध्यक्षांकडं दिलं आहेत. परंतु, विधानसभा अध्यक्ष हे त्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतच्या प्रतीक्षेत आहेत. आता तरी, विधानसभा अध्यक्षांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी. ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी आमच्या पक्षाच्या बाबतीत जी तत्परता दाखवली आणि जो निर्णय दिला, ती तत्परता आता माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत पण दाखवावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी," असा टोला उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला.

हेही वाचा :

  1. कर्नाटकात एसटी चालकाला मारहाण; संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधानांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेत..."
  2. माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरण: घटनात्मक तरतुदींनुसार कारवाई होणार, राहुल नार्वेकरांनी दिली माहिती
  3. कर्नाटकला जाणाऱ्या एसटी कधीपर्यंत राहणार बंद, प्रताप सरनाईक यांनी स्पष्टचं सांगितलं
Last Updated : Feb 23, 2025, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details