मुंबई - महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यावरही आता संजय राऊत यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी सोमवारी घोषित होईल, असं ते म्हणालेत. तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्यात, यावरही संजय राऊतांनी टीका केलीय.
महाराष्ट्रासाठी एक कलंक :संजय राऊत म्हणालेत की, शिवसेनेनं दिल्लीत कधीच उठाबशा काढल्या नव्हत्या. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागील तीन दिवसांपासून अमित शाहांच्या दरवाजात बसलेत. हा महाराष्ट्रासाठी एक कलंक आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी किंवा उमेदवारीसाठी कधीच दिल्लीमध्ये गेले नाहीत. एक काळ असा होता की, भाजपाचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे मातोश्रीवर येऊन चर्चा करायचे. त्यामुळेच जागा वाटपाचा तिढा महायुतीत अडला आहे, आमच्याकडे नाही. आमच्या उमेदवारांची अंतिम यादी सोमवारी घोषित होणार आहे. तसेच आमचे मित्रपक्ष नाराज होणार नाहीत, इतक्या जागासुद्धा आम्ही त्यांना सोडल्यात. शिवडीमध्ये विद्यमान आमदार अजय चौधरींना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घोषित केलीय. याकरिता सुधीर साळवींना नाराज होण्याची काही आवश्यकता आहे, असं वाटत नाही. ते आमचे पदाधिकारी आहेत. एका मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असू शकतात.
एकनाथ शिंदे किंवा जय शाह : वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असून, या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जातेय. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मिलिंद देवरा कशासाठी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे किंवा जय शाह यांनी निवडणूक लढवावी. ती इतकी मोठी प्रतिष्ठेची जागा आहे की, त्या ठिकाणी मोठा आणि तगडा उमेदवाराच हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.
काही ठिकाणी एडिट होऊ शकतं :संजय राऊत यांनी अजूनही एक धक्कादायक खुलासा केलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केलीय. त्यामध्ये काही ठिकाणी एडिट होऊ शकतं, असं सांगून संजय राऊत यांनी उमेदवारांची अदलाबदल केली जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिलेत. तसेच वांद्रे पूर्व येथून अजित पवार गटाने झिशान सिद्दिकी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुणीही मैदानात उतरले तरी वरुण सरदेसाई नक्कीच निवडून येतील.
हेही वाचा :
- घड्याळ चिन्हाचा वापर करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'या' नियमाचे करावे लागणार पालन
- बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर