नागूपर/मुंबई -नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न, ईव्हीएम घोळ आदी प्रश्नावरून आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सभागृहातील उपस्थिती लावली. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलंय. मात्र उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, राज्यात नवीन राजकीय भूकंप होणार का? किंवा राज्यात काही नवं पाहायला मिळणार का? असे तर्कवितर्क काढले जाताहेत.
भेटीचं कारण काय? :उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाची वेळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचं बोललं जातंय. यावेळी आमदार भास्कर जाधव, अनिल परब, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते. मात्र सध्या महाविकास आघाडीत कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी अपेक्षित आमदारांचं संख्याबळ नाही. आवश्यक आमदारांचे संख्याबळ नसल्यामुळं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे राहणार? यावरून सध्या चर्चा सुरू आहे. मात्र ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर आपला यापूर्वीही दावा केलाय आणि कदाचित शिवसेना ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.
शिवसेना फुटीनंतर निवांतपणे पहिल्यांदाच भेट :महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि महाविकास आघाडीचे सरकार असताना 2022 मध्ये मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलंय. या शिवसेना फुटीला देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिवसेना फुटीनंतर शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह यासाठी ठाकरे गटाने मोठा संघर्ष केलाय. अजूनही कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. परंतु शिवसेना फुटीसाठी जर कारणीभूत आणि जबाबदार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत, असं ठाकरे गटाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर याआधी ठाकरे-फडणवीस एकवेळ धावती भेट अधिवेशनात झाली होती. मात्र शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागून आणि निवांतपणे ही पहिल्यांदाच भेट घेतलीय. या भेटीनंतर राज्यात नवीन काही पाहायला मिळणार का? किंवा राजकीय भूकंप होणार का? किंवा उद्धव ठाकरे गट सरकारमध्ये सामील होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून, विविध तर्कवितर्क काढले जाताहेत. मात्र ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते मिळावं, ही मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचाः