मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एच.एन. रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांची आज आज (14 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजल्यापासून एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती.
उद्धव ठाकरेंवर याआधीही करण्यात आलीय अँजिओप्लास्टी :तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे आज चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
आदित्य ठाकरेंनी दिली माहिती :आदित्य ठाकरेंनी सोशल मिडिया 'x' वर पोस्ट करत उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत माहिती दिलीय. "आज सकाळी उद्धव ठाकरे यांची एच.एन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी करण्यात आली. सर्व काही ठीक आहे. लोकांची सेवा करण्यास ते पूर्णपणे तयार आहेत." असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
विधानसभा निवडणूकची तयारी सुरू :विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीनंही चांगलीच कंबर कसलीय. दोन दिवसांपूर्वी दसरा मेळावा घेत उद्धव ठाकरे यांनी संबोधिक केलं. त्यानंतर काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यात देखील उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्यामुळं ठाकरे गटात चिंतेचं वातावरण आहे.
मुख्यमंत्रिपदावर प्रतिक्रिया : उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिक्रिया दिली. युतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आधी महायुतीला आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू द्या, त्यानंतरच आम्ही आमच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू."
हेही वाचा
- "लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना;" एकनाथ शिंदे म्हणतात...
- दहा हजार वर्षात एवढे लाचार आणि लोचट सरकार झाले नव्हते - संजय राऊत
- मुंबईत हलक्या वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळात घोषणा