मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं त्यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) आपल्या पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची निवड केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे) यांनी सुद्धा आपल्या गटनेतेपदाची निवड केली आहे. शिवसेना (ठाकरे) नवर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड -विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले. या नवनिर्वाचित आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं. मातोश्री येथे या नवर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभवाची कारणे काय असावीत याचा विचार करण्यात आला. तसंच राजकीय प्रवासात पक्षाची पुढील रणनीती काय याबाबत खलबतं झाला. दरम्यान, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर गेल्यावेळी प्रतोद राहिलेले सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आलं आहे.
शिवसेना गटनेते पदाची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावी अशी यावेळी विनंती केली. मात्र आपण सातवेळा आमदार झाला आहात. गटनेतेपदाची जबाबदारी मोठी आहे. त्याची धुरा तुमच्याच खांद्यावर असली पाहिजे, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी गटनेते पद आपल्यावर सोपवलं. - भास्कर जाधव