मुंबई MVA Face of Chief Minister : मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी याबाबत दिल्लीत वरिष्ठ स्तरावर हाय कमांड निर्णय घेतील असं सांगितलं होतं. तर अगोदर शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं होतं. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी देखील याविषयी रोखठोक भाष्य केल्यानं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे गटानं सुद्धा आपला हट्ट सोडत मवाळ भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही असणारे शरद पवार आता मागे हटल्याचं बघायला मिळतंय.
सुंठी वाचून खोकला गेला :उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा अशी मागणी केली होती. त्यानंतर यावर स्पष्टपणे न बोलता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निवडणूक लढेल असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं ठाकरे गटाला वाटू लागलं होतं. परंतु कोल्हापूरमध्ये बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर विचार करण्याचे तुर्त कुठलेच कारण नाही. राज्यात नेतृत्व कोणी करायचे हा निवडणूक झाल्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेता येईल. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या पाठिंब्या नंतर राज्यात एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे आणि ते आमचं प्राथमिक उद्दिष्ट आहे, असं सांगून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आत्ताच उत्सुकता असणं गरजेचं नाही हे स्पष्ट केलं. शरद पवारांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसही सुखावली असून सुंठी वाचून खोकला गेला असं त्यांना वाटू लागलंय.
नाना पटोलेंचं समर्थन : शरद पवार यांच्या भूमिकेचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समर्थन केलंय. शरद पवार हे काही चुकीचं बोलले नसून, आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं नाना म्हणाले. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर काही वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील महाभ्रष्ट सरकार हटवणं :मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली खलबत्त आणि त्यानंतर शरद पवार, नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका यावरुन उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील आपला सूर बदलला आहे. तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. आमच्या तिघांमध्ये एकमत असून कोण किती जागा जिंकणार यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल असं ते म्हणालेत. सध्याच्या घडीला राज्यातील महाभ्रष्ट सरकार हटवणं याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. ठाकरे गटानं आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतचा आग्रह सोडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालाय, असं ते म्हणाले.