महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका व्यक्तीच्या हातात देश देणं धोकादायक, देशात संमिश्र सरकार हवं - उद्धव ठाकरे - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : एकाच व्यक्तीच्या हातात देश दिल्यानंतर देश हुकूमशाहीच्या वाटेनं जातोय. त्यामुळं देशाला वाचवायचं असेल तर एका व्यक्तीच्या हातात देश देऊन चालणार नाही. देशात संमिश्र सरकार असायला हवं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मुंबईत बोलत होते.

Lok Sabha Election
उद्धव ठाकरे यांचं संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 7:20 PM IST

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसंच भारत राष्ट्र समितीच्या काही नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच भाजपावर कडाडून टीका केली.

देशाला संमिश्र सरकारची गरज : राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय. बिनशर्त म्हणजे नेमके काय? हे आधी त्यांना विचारा. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून सोबत जात आहेत, काही विरोधात लढतो म्हणून अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत, असा टोमना त्यांनी राज ठाकरेंना मारला. या देशाला निश्चितच कणखर नेतृत्वाची गरज आहे, पण हे नेतृत्व सर्वसमावेशक असलं पाहिजे. गेल्या दहा वर्षांमध्ये एका व्यक्तीच्या हातात देश दिल्यामुळं काय परिस्थिती झाली, हे आपण सर्वजण पाहतोय. आणखी पाच वर्ष जर एकाच व्यक्तीच्या हातात देश गेला, तर पुढच्या निवडणुकीपूर्वी आपल्याला बोलण्याचंही स्वातंत्र्य राहणार नाही. हा देश हुकूमशाहीच्या दिशेनं गेलेला निश्चित दिसेल. यापूर्वी देशात संमिश्र सरकारं आली होती. त्यात अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, पी. व्ही नरसिंहराव यांच्या सरकारचं नावं घेता येईल. या सर्वांचे सरकार संमिश्र होतं. त्यावेळी त्यांनी उत्तम काम केलं. त्यामुळं देशाला जशी कणखर, सर्वांना समजून घेणाऱ्या नेत्याची गरज आहे, तशीच संमिश्र सरकारची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

कणखर आहात मग भाड्यानं का लोक घेता : मोदींसह भाजपा कणखर असल्याचा दावा करत आहेत. मात्र, ते कणखर असते तर, त्यांनी अन्य पक्ष फोडून स्वतःच्या पक्षात लोकं का घेतले? याचं उत्तर द्यायला हवं. आज भारतीय जनता पक्षातील मूळचे नेते कुठंही दिसत नाहीत. भाजपानं बेरोजगारी, 15 लाख, शेतकऱ्यांच्या पीकांना दुप्पट भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात यापैकी काहीही झालं नाही. त्यानंतर देशानं अधोगतीकडं वाटचाल सुरू केलीय. भ्रष्टाचार मुक्त देश करू असं भाजपाचा नारा होता. मात्र, यांनी सर्व भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं. त्यामुळं अन्य पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाल्याचा टोला ठाकरेंनी भाजपाला लगावला.

उत्तर मुंबईतून जागा काँग्रेसनेच लढवावी : सांगलीच्या जागेवरील उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला सोडलेली आहे. त्यामुळं सांगलीच्या जागेवर कोणाची नाराजी असेल, तर त्या पक्षानं आपापल्या कार्यकर्त्यांना समजावलं पाहिजे. कारण आता जागावाटप झालं आहे. उत्तर मुंबईतून आम्ही निश्चितच काँग्रेसला पाठिंबा देऊ. मात्र, आमचा नेता काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणे शक्य नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का :

  1. 'एकनाथ शिंदे गट म्हणजे भाजपाची XXX'; संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका - Sanjay Raut
  2. 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
  3. आम्हाला राज्य नाही तर सेवा करायचीय; अनुराग ठाकुर यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर - Anurag Thakur

ABOUT THE AUTHOR

...view details