महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल; राहुल नार्वेकरांच्या निवडीवरुन उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray : देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या (Anti Defection Law) अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड करण्यात आली. हे म्हणजे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केलाय.

Uddhav Thackeray question
उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 5:39 PM IST

मुंबई Uddhav Thackeray : राजकीय नेते आणि कार्यकर्ते पक्षांतर करतात. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याबाबत (Anti Defection Law) पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी (Om Birla) समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांच्या निवडीवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली.

लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल : देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक करण्यात आली. हे म्हणजे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. "महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उरफाटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच; परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून टीका केली.

लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल : शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येण्यास वेळ लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंची नार्वेकरांवर टीका : यापूर्वीही उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुला नार्वेकरांवर टीका केली होती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाविरोधात ठाकरे गटानं मुंबईतील वरळीत 16 जानेवारी, 2024 रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला कायदेतज्ज्ञ, जनता, पत्रकार, राजकीय विश्लेषक, राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी वकील असीम सरोदे, रोहित शर्मा यांनी राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे, हे कायद्याच्या भाषेत समजून सांगितलं होतं. पण आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळं याचा निर्णय जनताच घेईल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला होता.

हेही वाचा:

  1. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश
  2. आरपीआयच्या मेळाव्याकरिता रामदास आठवले लखनौच्या दौऱ्यावर, मायावतींना काय दिली ऑफर?
  3. सर्वोच्च न्यायालयाचा आंध्र प्रदेश सरकारला दणका; चंद्राबाबू नायडूंविरोधातील याचिका फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details