मुंबई Uddhav Thackeray:डोंगरी, भायखळा परिसरातील शिवसेना शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना बहुमताने विजयी करा, असं आवाहन यावेळी शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी केलं.
गाफील राहू नका :मे महिन्यात शाळांना सुट्टी असेल, मुंबईत बहुसंख्य मराठी माणसे ही कोकणी आहेत. कोकणी माणूस या काळात कोकणात जातात. आपल्या गावी जातात, मात्र २० मे रोजी केंद्रातील मोदी सरकारचे बारा वाजवायला मुंबईत परत या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत २० मे ला निवडणूक आहे. गाफील राहू नका, असं सांगत त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. छापे टाकायचे आणि काटे काढायचे हाच उद्योग भाजपाने केला. पूर्वीचे भाई कुणी मारूती कार घेतली तर त्यांना खंडणी मागायचे. आताचे भाई कंपन्यांना फोन करून बोलावून घेतात आणि खंडण्या वसूल करतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच निवडणूक रोखे निधीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. भाजपा आणि मोदी-शाह यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळाचा कार्यअहवाल प्रकाशित केल्यास किती पक्ष फोडले? किती कुटुंब फोडले? किती सरकारे पाडली? हेच यातून दिसेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मोदी सरकारवर घणाघात केला.