महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात भरदिवसा झालेल्या गोळीबारात दोन गुंड जखमी, हल्लेखोरांपैकी एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात - FIRING IN SATARA

साताऱ्यात भरदिवसा करण्यात आलेल्या गोळीबारात दोन गुंड जखमी झाले. या घटनेमुळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.

satara firing
साताऱ्यात गोळीबार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2025, 6:57 PM IST

Updated : Jan 27, 2025, 10:40 PM IST

सातारा - जावली तालुक्यातील मेढा पोलीस ठाण्यात हजेरी लावून साताऱ्यात आलेल्या अमर गणेश पवार आणि श्रेयस सुधीर भोसले, या गुंडांवर सोमवारी दुपारी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या. कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेत एका गुंडाच्या पोटाला तर दुसऱ्याच्या पायाला गोळी चाटून गेली. गोळीबार करून पसार झालेल्या दोनपैकी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल :कोंडवे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबारात अमर पवार याच्या पायात गोळी घुसली असून दुसरी गोळी श्रेयस भोसले याला चाटून गेली आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस या घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत.

गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद :कोंडवे हद्दीतील गोळीबाराची घटना नजीकच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. त्याआधारे संशयितांची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पोलीस तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी दिली आहे.

गुंडांच्या पार्टीतील राडा प्रकरणाशी गोळीबाराचा संबंध? :दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकीव (ता. जावली) येथील जय मल्हार रिसॉर्टमध्ये गुंडांनी पार्टी आयोजित केली होती. बारबालांना नाचवून दारूच्या नशेत ग्राहकांच्या डोक्यात बाटल्या फोडत हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा गोळीबाराच्या घटनेशी संबंध असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार; संशयित माथेफिरूला अटक, पिस्तूल जप्त

Last Updated : Jan 27, 2025, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details