छत्रपती संभाजीनगर Students Sut Katai : गांधी जयंतीनिमित्त एमजीएम विद्यापीठात सामूहिक 'सूत कताई'चा कार्यक्रम राबवण्यात आला. 2 हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेला हा पहिलाच उपक्रम असल्यानं या उपक्रमाची 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. सामूहिक 'सूत कताई'च्या उपक्रमात विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक विज्ञान, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, डिझाईन अशा सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
2 हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग :महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं महात्मा गांधींच्या 155 व्या जयंतीनिमित्त आज सकाळी 7 वाजल्यापासून एमजीएम विद्यापीठाच्या जेएनईसी लॉन येथे 2000 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा 'सूत कताई' करण्यास सुरुवात केली. आशिया खंडात एखाद्या शैक्षणिक संस्थेनं अशाप्रकारचा उपक्रम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपक्रमात 250 विद्यार्थ्यांचे असे एकूण 8 गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटानं अर्धा तास 'सूत कताई' करून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
दोन हजार विद्यार्थ्यांकडून 'सूत कताई' (Source - ETV Bharat Reporter) उपक्रमात 'या' चरख्यांचा वापर करण्यात आला.
- स्पिंडल चरखा : 110
- दोन स्पिंडल चरखा : 200
- आठ स्पिंडल चरखा : 30
- पेटी चरखा : 10
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम : "चरख्याच्या माध्यमातून 'सूत कताई' करीत असताना मेंदू, हृदय आणि आपले हात एकत्रितरित्या काम करतात. यामध्ये आपल्याला आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मदत होते. या तयार होणाऱ्या सुतापासून खादीचे कपडे आणि इतर संबंधित वस्तु बनविल्या जाणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह 350 शिक्षकांना 'सूत कताई'चे प्रशिक्षण देण्यात आले. एमजीएम विद्यापीठात असणाऱ्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, व्यवस्थापन आणि वाणिज्य, सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या, प्रयोगकला विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय शिक्षण, फॅकल्टी ऑफ डिझाईन या सातही विद्याशाखेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले," असं कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितलं.
महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारं विद्यापीठ : "महात्मा गांधी यांचे विचार कायम प्रेरणा देणारे असून एमजीएम विद्यापीठ हे महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारं विद्यापीठ आहे. येथे वर्षभर विविध प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. गांधी तत्वज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, खादी केंद्र, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, व्याख्यानं असे विविध उपक्रम येथे राबवण्यात येतात. शाश्वत विकास, पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वावलंबन, स्वदेशी, खादी या क्षेत्रात अगोदरपासून कार्यरत असलेल्या एमजीएम विद्यापीठानं या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे, अशी माहिती कुलसचिव आशिष गाडेकर यांनी दिली.
हेही वाचा
- महात्मा गांधी जयंती 2024; महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांना विविध पक्षांतील नेत्यांनी वाहिली आदरांजली - Mahatma Gandhi Jayanti 2024
- गांधी जयंती निमित्त राज ठाकरे यांचा वाचाळ वीरांना टोला - Raj Thackeray
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना बजावले समन्स - Vinayak Savarkar Defamation Case