महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनंत राधिकाच्या लग्नात दोन संशयितांची घुसखोरी; बीकेसी पोलिसांनी दाखल केले गुन्हे - Anant Radhika Wedding - ANANT RADHIKA WEDDING

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडला. मात्र या विवाह सोहळ्यात दोन संशयितांनी घुसखोरी केल्यानं मोठी खळबळ उडाली. या दोन घुसखोरांवर बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Anant Radhika Wedding
संग्रहित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 7:00 AM IST

मुंबई Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या जगभरात चर्चा सुरू आहेत. त्यांच्या तीन दिवसांचा शाही विवाह सोहळ्यास 12 जुलैपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या ठिकाणी दोन संशयितांनी बेकायदेशीर प्रवेश केला. या प्रकरणी या दोघांवर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लुकमान मोहम्मद शफी शेख (वय 28) आणि व्यंकटेश नरसैया अलुरी (वय 26) अशी त्या दोघांची नावं आहेत. बीकेसी पोलिसांनी सांगितलं की, "या दोघांना कार्यक्रमस्थळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. नोटीस बजावून त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे."

अनंत राधिकाच्या लग्नात दोन संशयितांची घुसखोरी :बीकेसी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, "लुकमान मोहम्मद शफी शेख (वय 28) आणि व्यंकटेश नरसैया अलुरी (वय 26) या दोघांनी लग्नात घुसखोरी केली. त्यांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पकडण्यात आलं. शेख हा व्यवसायानं व्यापारी असून अलुरी हा आंध्र प्रदेशचा युट्यूबर आहे. या दोन्ही आरोपींनी दावा केला की, ते हा प्रसिद्ध शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी आले. तर अलुरी यानं हा संपूर्ण शाही विवाह सोहळा त्याच्या कॅमेरात रेकॉर्ड करुन त्याच्या सोशल माध्यमातील चॅनेलवर दाखवयाचा होता," असा दावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आंध्रप्रदेशातून येत लग्नात केली घुसखोरी :शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता सुरक्षा रक्षक आकाश येवस्कर आणि त्याच्या सहकाऱ्याला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या पॅव्हेलियन 1 जवळ व्यंकटेश नरसैया अलुरी फिरताना दिसला. दोन्ही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नंतर त्याची चौकशी केली. यावेळी सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर व्यंकटेश नरसैया अलुरीनं स्वतःला युट्यूबर असल्याची ओळख सांगितली. तो आंध्रप्रदेशचा असल्याचं तपासात उघड झालं. "व्यंकटेश नरसैया अलुरीनं विवाह सोहळ्याच्या ठिकाणी अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं. गेट क्रमांक 23 मधून त्याला कोणतंही आमंत्रण नसल्यानं आत जाऊ दिलं नाही. नंतर तो कसा तरी गेट क्रमांक 19 मधून अवैधरित्या प्रवेश करण्यात यशस्वी झाला" अशी माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली.

सुरक्षा रक्षकांसोबत घातली हुज्जत :बीकेसी पोलिसांनी सांगितलं की, व्यंकटेश नरसैया अलुरीला निघून जाण्याची विनंती करण्यात आली. परंतु तो तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्यानं त्याला पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आलं. त्याचप्रमाणं शनिवारी मध्यरात्री 2.40 वाजताच्या सुमारास शेखला जिओ वर्ल्ड सेंटरच्या पहिल्या मजल्यावर नियमित तपासणी दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं. "एका सुरक्षा रक्षकाला शेख संशयास्पद फिरत असल्याचं आढळलं. त्यानंतर त्यांनी त्याला आमंत्रण आहे का, याबाबत चौकशी केली. मात्र, त्याच्याकडं आमंत्रण नसल्यामुळे त्याला सुरक्षा व्यवस्थापकाच्या ताब्यात देण्यात आलं. त्यावेळी त्यानं सांगितलं की, तो पालघरचा राहणारा असून त्यानं गेट क्रमांक 10 मधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. शेख यास जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर सोडण्यास सांगण्यात आलं. परंतु त्यानं सूचनांचं पालन न केल्यानं त्याला बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या दोघांविरुद्ध घुसखोरी संबंधित कलमांतर्गत बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांना नोटीस बजावण्यात बजावून सोडून देण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

  1. अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' - ANANT RADHIKA WEDDING
  2. अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding
  3. अनंत अंबानीच्या लग्नात बाबा रामदेव थिरकले, डान्स व्हिडिओ व्हायरल - Baba Ramdev Dance Video Viral

ABOUT THE AUTHOR

...view details