पुणे :आज 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र-मंडळींना केक भरवून शुभेच्छा दिल्या जातात. पुणे शहरात देखील विविध चर्चमध्ये आज मोठ्या उत्साहात 'ख्रिसमस' सण साजरा केला जात आहे. मध्यरात्री पासूनच चर्चमध्ये विविध कार्यक्रम झाल्यावर आज सकाळपासून चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पहिलं मराठी ख्रिस्ती मंडळी अशी ओळख असणाऱ्या पुण्यातील गुरुवार पेठेतील 'द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय' चर्चमध्ये देखील मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येत आहे.
येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून 'ख्रिसमस' हा सण साजरा केला जातो. पुण्यातील प्रत्येक चर्चमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण 'द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय' सुद्धा याला अपवाद नाही. तब्बल 130 फूट उंच मनोरा आणि स्वरांच्या 8 घंटा असलेलं हे चर्च पुण्यातील आकर्षणाचा विषय आहे. पहिलं मराठी ख्रिस्ती मंडळाचं चर्च अशीदेखील या चर्चची ख्याती आहे. 'ख्रिसमस' निमित्त या चर्चमध्ये अनेक सामाजिक संस्था तसंच राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.