पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. भुजबळ हे भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, छगन भुजबळ साहेब हे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी गेल्या 40-45 वर्षांमध्ये राज्यासाठी दिलेलं योगदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही. पवार साहेबांच्या अनेक संघर्षात भुजबळ साहेब पवार साहेबांसोबत उभे राहिलेत. मी आयुष्यभर हे विसरणार नाही, त्यांच्यावर मोठा अन्याय झालाय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
भुजबळ साहेब लढवय्या नेते : मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा त्यांना अटक झाली. त्यांच्या वेदना अन् संघर्ष मी जवळून पाहिलाय. मी अनेकदा जेलमध्ये त्यांना भेटायला गेलीय. त्याचं कुटुंब फार दुःखातून गेलंय. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलाय. भुजबळ साहेब लढवय्या नेते आहेत. वयाने तसेच नेतृत्वाने भुजबळ मोठे नेते आहेत. ते कालही आमचे नेते होते आणि आजही आमचे नेते असल्याचं सुप्रिया सुळेंनी अधोरेखित केलंय. सुप्रिया सुळे यांना तुम्ही भुजबळ साहेबांना तुमच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देत आहात का असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, आमंत्रण देण्याचा विषयच नाही. आमचे संबंध भुजबळ साहेबांच्या कुटुंबांसोबत कायम आहेत. आम्ही कोणासोबत कौटुंबिक संबंध तोडत नाही. संघर्ष काळात मी त्यांचे दुःख जवळून पाहिलंय. अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाने जे भोगलंय ते वेदनादायी आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत गोष्टींबद्दल मला माहीत नाही. माझं पोट मोठं आहे, सगळ्या पोटातल्या गोष्टी ओठावर आणायच्या नसतात. सगळं बोलायचं नसतं, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
खरं तर हा विषय संवेदनशील : तसेच बीड आणि परभणी येथील घटनेबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, संदीप क्षीरसागरांसह इतर नेत्यांनी न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवलाय. सगळ्यात आधी तिथं पवार साहेब गेलेत. त्यानंतर सत्तेत असलेले नेते तिकडे गेले. खरं तर हा विषय संवेदनशील आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, यात राजकारण आणू नये, राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे. या दोन्ही कुटुंबीयांना परभणी आणि बीडमधील नेत्यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आहे. तसेच सरकारला विधानसभेत मोठं यश मिळालेलं असल्यानं त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याला न्याय दिला पाहिजे, असंही यावेळी सुळेंनी सांगितलंय.
कुटुंबावर होणारा अन्याय थांबला पाहिजे : बीड कुटुंबीयांना सर्वच जण भेट देऊन आश्वासन देत आहेत. मात्र कारवाई केली जात नाहीये. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, सरकार कारवाई का करीत नाही याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे. मला प्रश्न विचारण्याऐवजी गृहमंत्र्यांना याबाबत विचारलं पाहिजे, हा गंभीर विषय आहे. राजकारण होत राहील, पण कुटुंबावर होणारा अन्याय थांबला पाहिजे, दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भावनाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -