मुंबई - कोविड काळात सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा आणि गरिबांचा मसिहा अशी नवी ओळख मिळालेला अभिनेता सोनू लसूद त्याच्या आगामी 'फतेह' या मास अॅक्शन चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहे. फतेह बॉक्स ऑफिसवर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण स्टारर चित्रपट 'गेम चेंजर'शी स्पर्धा करणार आहे.
कोविड काळात लोकांना केलेल्या मदतीनंतर सोनू सूद देशभऱ लोकप्रिय झाला होता. याच काळात सोनू सूदला अनेक राजकीय ऑफर आल्या होत्या आणि त्याने त्या सर्व नाकारल्या होत्या. सोनूबाबत असं बोलले जात आहे की, त्याला सीएम-डेप्युटी सीएम अशा पदांची ऑफर देण्यात आली होती, पण सोनूनं ही पदं घेण्यास का नकार दिला ते जाणून घेऊया.
सोनू सूदला का मिळाली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
सोनू सूदनं नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये अभिनेता म्हणाला, "मला सीएम पदाची ऑफर आली होती, पण मी नकार दिल्यानंतरही त्यांनी मला डेप्युटी सीएम बनण्यास सांगितलं होतं, देशाच्या प्रभावशाली लोकांनी मला ऑफर दिली होती, म्हटलं होतं की आमच्यात सामील व्हा, हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता."
सोनू सूदने ऑफर का नाकारली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार सोनू पुढे म्हणाला, "लोकप्रिय झाल्यानंतर लोक आकाशात उडायला लागतात आणि आकाशात ऑक्सिजन कमी असतो, आम्हालाही वर यायचे आहे, पण तिथं राहणे कठीण आहे, असे लोकांनी मला सांगितले. ते मोठे-मोठे तारे राजकारणात येण्याचं स्वप्न पाहतात आणि तुम्ही ते नाकारता, मी म्हणालो की लोक राजकारणात दोन कारणांसाठी येतात, सत्ता आणि पैशाची हाव, पण मला या दोन्ही गोष्टींमध्ये रस नाही, पण मी लोकांसाठी आहे. मी अशीच मदत करत राहीन, राजकारणात येऊन मला माझे स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य संपवायचं नाही."
सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'फतेह' चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सोनू सूदने स्वतः दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये विजय राज, नसीरुद्दीन शाह, दिव्येंदू भट्टाचार्य आणि प्रकाश राज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.