महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातशे वर्षांपूर्वी भारतात सुरू झाला होता तुघलकी कारभार, जाणून घ्या 'तुघलकी कारभार' या वाक्यप्रचाराची रंजक कहाणी - TUGHLAKI KARBHAR

अनेक भाषांमध्ये 'तुघलकी फरमान' किंवा 'तुघलकी कारभार' हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. मात्र, या वाक्यप्रचाराची सुरुवात कोठून झाली. त्यामागचा इतिहास काय? याविषयी आपण जाणून घेऊया...

Tughlaki karbhar began in India seven hundred years ago, know the interesting story behind the phrase Tughlaki karbhar
'तुघलकी कारभार' या वाक्प्रचाराची रंजक कहाणी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 7:57 AM IST

Updated : Feb 1, 2025, 8:27 AM IST

अमरावती : 'तुघलकी कारभार' हा वाक्यप्रचार भारतातील अनेक भाषांमध्ये रूढ आहे. मराठी भाषेत देखील 'तुघलकी कारभार' या वाक्यप्रचाराचा अनेकदा वापर केला जातो. तसंच राजकारणात तर अनेकदा तुघलकी कारभारासंदर्भात अनेक राजकारणी एकमेकांचा उद्धार करताना पाहायला मिळतात. मात्र, 'तुघलकी कारभार' हा अनोखा वाक्यप्रचार नेमका कसा रूढ झाला. यामागे एक रंजक असा इतिहास आहे.

1 फेब्रुवारी 1325 अर्थात आजपासून सातशे वर्षांपूर्वी भारताचा सुलतान म्हणून मोहम्मद तुघलक दिल्लीच्या गादीवर आरुढ झाला. तिथून पुढं 26 वर्ष म्हणजे 20 मार्च 1351 पर्यंत भारतात तुघलकी कारभार होता. हा तुघलकी कारभार नेमका कसा होता? तुघलकी कारभार हा वाक्प्रचार नेमका कसा मराठी भाषेत आला? या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

अशी आली मोहम्मद तुघलकाची सत्ता : "मोहम्मद तुघलक याचे वडील आणि भाऊ एका राजवाड्याखाली दबून ठार झाले. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद तुघलक यानंच हा घातपात घडवून आणला होता. या घटनेनंतर तुघलक घराण्याचा वारस म्हणून 1 फेब्रुवारी 1325 ला दिल्लीच्या गादीवर मोहंमद तुघलक आरूढ झाला. 1325 ते 1351 अशी 26 वर्ष त्याची भारतावर सत्ता होती," अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी थॉट्स' या अभ्यासक्रमाचे प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

चार अजब निर्णय : भारताचा सुलतान म्हणून मोहम्मद तुघलक यानं चार अजब निर्णय घेतले. त्यानं घेतलेले चारही निर्णय फसलेत. यामुळं त्याचा उल्लेख इतिहासकार 'वेडा सुलतान' असं म्हणूनही करतात. हे चारही निर्णय अतिशय अजब होते. त्यावेळी मोरक्को देशातून भारतात आलेला विख्यात प्रवासी इब्न बतूता यानं मोहम्मद तुघलकनं घेतलेले निर्णय आणि त्याचे किस्से लिहून ठेवलल्याचं प्राध्यापक मस्के यांनी सांगितलं.

दिल्लीवरून देवगिरीला हलवली राजधानी : पुढं ते म्हणाले की, "मोहम्मद तुघलक यानं अचानक आपली राजधानी दिल्लीवरुन दक्षिणेत देवगिरी अर्थात आजच्या दौलताबाद या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचा प्रजेनं कडाडून विरोध केला. असं असलं तरी दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला देवगिरीला यावंच लागेल, असं फर्मान त्यानं काढलं. जे यायला तयार नव्हते, त्यांना दोरखंडानं बांधून देवगिरीला नेण्यात आलं. अतिशय त्रास सहन करत दिल्लीची जनता देवगिरीला पोहोचली. मोहम्मद तुघलकाचं शासन देवगिरीला सुरू झालं. यानंतर अडीच वर्षानंतर मोहम्मद तुघलक यानं आपली राजधानी दिल्लीच बरी म्हणत प्रत्येकानं पुन्हा दिल्लीला चलावं, असा निर्णय घेतला. त्याच्या प्रजेला पुन्हा हाल सहन करत देवगिरीवरून दिल्लीला यावं लागलं.

चलनात असणारी नाणी बदलवली : दिल्लीत पुन्हा एकदा मोहम्मद तुघलकाचा राज्यकारभार सुरू झाला. त्याच्या सत्तेत सर्व व्यवहार हे सुवर्ण आणि चांदीच्या नाण्यांनी व्हायचे. गरीब जनतेकडं सोनं-चांदी नव्हते. यामुळं त्यानं आपल्या राज्यात तांब्याची नाणी चलनात आणण्याचा निर्णय घेतला. त्या काळात दिल्लीतील प्रत्येकाकडं मोठ्या प्रमाणात तांबं होतं. त्याच्या प्रजेनं घरीच तांब्याची नाणी तयार केली. मात्र, या प्रकारानं राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली. मोहम्मद तुघलकाला आपला निर्णय चुकला, असं वाटलं. त्यानं पुन्हा सुवर्ण आणि चांदीची नाणी चलनात आणण्याचा निर्णय घेतला. जनतेनं आमच्याकडं असलेल्या तांब्याच्या नाण्यांचं काय करायचं? असा सवाल केल्यावर जनतेकडं असणारी तांब्याची नाणी जनतेनं सुलतानाकडं सोपवावी, असे फर्मान काढलं. तांब्याच्या बदल्यात सोने आणि चांदीची नाणी घेऊन जावी, असा आदेश त्यानं काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजाच्या दरबारासमोर नाण्यांचा ढीग लागला. चलनी नाण्यात बदल करण्याचा निर्णय पूर्णतः फसल्यामुळं मोहम्मद तुघलकाच्या काळात अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आली.

आधुनिक शेतीचा निर्णय फसला : शेतकऱ्यांचा फायदा होईल, यासाठी आधुनिक शेती शेतकऱ्यांनी करावी. ती नेमकी कशा पद्धतीनं करायची, यासाठी मोहम्मद तुघलक यानं त्याच्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सहा महिन्यासाठी दिल्लीत बोलवलं. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली. शेती करण्याकरिता त्यानं लक्षावधी हेक्टर जमीन संपादित केली. या शेतीत उत्तम प्रकारचे पीक येईल, असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. मात्र, प्रत्यक्षात सहा महिन्यात विशेष असं कुठलंच पीक शेतीमध्ये निघालं नाही. शेतकरी नाराज होऊन परतले. आदर्श शेतीचा प्रयोग करण्याचा मोहम्मद तुघलकाचा हा निर्णयही फसला.

गंगेच्या खोरेत वाढवला कर : राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस आली असताना अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशानं गंगेच्या खोऱ्यात असणाऱ्या सुपीक प्रदेशात कर वाढवण्याचा निर्णय मोहम्मद तुघलक यानं घेतला. त्याची माणसं कर वसुलीसाठी त्या भागात गेली. मात्र, नेमका त्याच वर्षी प्रचंड दुष्काळ पडला. त्या भागातील जनता नाराज झाली. मोहम्मद तुघलक याला परिस्थिती कळल्यावर तो स्वतः गंगेच्या खोऱ्यात आला. त्यानं नाराज झालेल्या जनतेची माफी मागितली. त्यानं घेतलेले हे चारही निर्णय अव्यवहारी होते. यामुळंच त्याला 'वेडा सुलतान' असं म्हटलं जाते. त्याच्या या चार निर्णयामुळंच अजब अशा तुघलकी कारभाराची चर्चा संपूर्ण देशात व्हायला लागली. तुघलकी कारभार हा वाक्यप्रचार इतर अनेक भाषांप्रमाणे मराठी भाषेतदेखील रुढ झाला, असं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.

मुर्खासारखे वाटणारे निर्णय मात्र होते योग्य :मोहम्मद तुघलक यानं घेतलेल्या चारही निर्णयामुळं तो बदनाम झाला, हे जरी खरं असलं तरी त्याच्या त्या चारही योजना काळाच्या फार पुढच्या होत्या. त्या सर्व योजना त्याच्या दूरदृष्टीचा परिचय देणाऱ्या होत्या, असंही वैभव मस्के यांनी स्पष्ट केलं. अतिशय क्रूर असणारे मंगोलियन दिल्लीवर हल्ला करणार असल्याची माहिती मोहम्मद तुघलक याला मिळाली होती. दिल्लीतील जनता आणि सैन्य मंगोलियनांचा मुकाबला करण्यास सक्षम नव्हते. खरंतर यामुळंच मोहम्मद तुघलक यानं आपल्या प्रजेला दिल्लीवरुन देवगिरीला नेलं होतं. दिल्ली रिकामी झाल्यामुळं मंगोलियन आलेच नाही. दिल्ली सुरक्षित आहे, याची खात्री पटल्यावर त्यानं जनतेला पुन्हा देवगिरीवरून दिल्लीला हलवलं.

योग्य निर्णय होते-तांब्याची नाणी काढण्यामागंदेखील मोहम्मद तुघलक याचा निर्णय योग्यच होता. चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदी चलन चलनात आलं. तांब्याच्या नाण्यांमुळं प्रत्येकाच्या हाती चलन खेळत राहील, असं तुघलकाचं मत होतं. मात्र, जनता आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट धोरणामुळं त्याचा हा निर्णय फसला. आज आधुनिक शेती कशी करायची यासाठी भारतातून शेतकरी इस्त्राइलला जातात. अगदी तसंच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करावी? हे कळावं या उद्देशानं मोहम्मद तुघलक यानं शेतकऱ्यांना दिल्लीत बोलवलं. मात्र, त्याच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं बियाणं वापरल्यामुळं आधुनिक शेतीचा प्रयोग फसला.

प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्णय ठरले अव्यवहारी-राज्यात कर वाढवण्याचे आणि तो कमी करण्याचे अधिकार राज्यसत्तेला असतात. राज्याची आर्थिक घडी योग्यपणे बसविण्यासाठी मोहम्मद तुघलक यानं गंगेच्या खोऱ्यात असणाऱ्या सुपीक प्रदेशात करवाढीचा निर्णय घेतला. दुर्दैवानं त्यावर्षी तिथं दुष्काळ पडला म्हणून त्याचा निर्णय अव्यवहारी ठरला, असं वैभव मस्के सांगतात. एकूणच मोहम्मद तुघलक यानं घेतलेले निर्णय आणि त्याचा परिणाम पाहता त्याच्या जनतेनं त्याला वेड्यात काढलं. मोहम्मद तुघलकचा कारभार हा 'तुघलकी कारभार' म्हणून आज वाक्यप्रचारात आला, असं देखील मस्के यांनी स्पष्ट केलं.

मोहम्मद तुघलकाचा असा झाला शेवट : मोहम्मद तुघलक याला मुलबाळ नव्हतं. त्याच्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आली. अशा परिस्थितीत पुतण्याला घेऊन तो खोरासन प्रांतात युद्धाला निघाला. खोरासन प्रांताजवळ आल्यावर त्याच्या पुतण्यानं त्याला दोन-तीन हजार सैन्यासह बाहेरच थांबवलं. पुतण्या खोरासन प्रांतात शिरला. त्यानं दिवसभरात मोठा विजय मिळवून प्रचंड संपत्ती मिळवली. यानंतर दिल्लीला परतण्याऐवजी मोहम्मद तुघलक यानं तिबेटमध्ये जाऊन तिथून संपत्ती लुटून आणण्याचा निर्णय घेतला. तिबेट प्रांतालगत पुन्हा एकदा त्याच्या पुतण्यानं त्याला दोन-तीन हजार सैन्यासह बाहेर ठेवलं. तो तिबेट प्रांतालगत आतमध्ये शिरला. मात्र, सहा महिन्यानंतरही पुतण्या परतलाच नाही. त्यानंतर पन्नास-साठ सैनिक परत आले. त्यांनी आपली सारे सैनिक ठार झाल्याची माहिती दिली. यानंतर खचलेल्या मोहम्मद तुघलक यांनं दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासात सैनिक त्याच्याविरोधात बोलत आहेत, हे लक्षात आल्यावर त्यानं दिल्ली येईपर्यंत कोणीही बोलणार नाही, असा आदेश काढला. मार्गात ठट्ठा नावाच्या शहराजवळ सैन्यानं मुक्कामाचा निर्णय घेतला. मोहम्मद तुघलक हत्तीवर स्वार असताना माहुतानं हत्ता खाली बसवला. त्यावेळी हत्तीच्या अंबारीत मोहम्मद तुघलक मृतावस्थेत आढळला, अशी माहिती देखील मस्के यांनी दिली.

हेही वाचा -

  1. शिवरायांच्या काळातील तलवारी, दांडपट्टे, बिन्नोड, तोफ गोळे पाहिलेत का? पाहा स्पेशल रिपोर्टमधून..
  2. लाकडावर उभी दगडांची विहीर; सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पाण्याची खास व्यवस्था
  3. नवस फेडण्यासाठी 'या' नदीत सोडतात लाकडी पाळणा; 'ब्राह्मणवाडा थडी'त भाविकांची तुफान गर्दी
Last Updated : Feb 1, 2025, 8:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details