मुंबई Vidhan Parishad Elections:विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून त्यानुसार रणनीती आखण्यात आली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतली आहे. 2022 मध्ये त्यांनी दाखवलेल्या करिष्म्याची पुनरावृत्ती होणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडं महाविकास आघाडीही आपले तीन उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
11 जागांसाठी 12 उमेदवार : विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक महायुती तसंच महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले होतं. मात्र, अखेर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक रंजक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या पक्षानं राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहिर केलीय. त्यामुळं महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उबाठा) मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाचा पत्ता कट होणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
विधानभवनातच निवडणुकीची चर्चा :सध्या विधानभवनाच्या आवारात सर्वच पक्षांचे उमेदवार निवडणुकीची चर्चा करत आहेत. तसंच पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. यामध्ये अपक्ष आमदारांना अधिक महत्त्व प्राप्त झालं असून बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती, मनसे या छोट्या घटक पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. 288 आमदारांपैकी 14 जागा रिक्त असल्यानं एकूण 274 आमदार मतदान करतील. आमदारांना विजयी होण्यासाठी 23 (22.84) मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना (उबाठा) राष्ट्रावादी काँग्रेसनं आपल्या आमदारांना 10, 11, 12 असे तीन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केल्याचं वृत्त आहे. मंगळवार 9 जुलै हा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 10 वा दिवस आहे. 12 जुलै हा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी मतदान होणार आहे.