पुणे Truck Fall into Sinkhole at Pune : शहरात महानगरपालिकेचा एक ट्रक रस्त्यानं जात होता. नेहमीप्रमाणं तो कामानिमित्तानं रस्त्यानं आपल्या नियोजित ठिकाणी निघाला होता. तेवढ्यात जात असलेल्या रस्त्यावर अचानक भलामोठा खड्डा पडला आणि तो ट्रक त्या खड्ड्यात पडला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलंय. पुण्यातील बुधवार पेठ येथील प्रधान डाक घर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रक खड्ड्यात पडला (Source - ETV Bharat Reporter) कशामुळं खड्डा पडला? : अचानक भलामोठा खड्डा पडल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा खड्डा कशामुळं पडला? कसा पडला? याबाबत सुरुवातीला कुणालाही माहिती मिळाली नाही. मात्र, घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भेट देत पाहणी केली असता, त्यांनी याबाबत खुलासा केलाय. "तिथे जुनी विहीर होती व नंतर त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. रिव्हर्स घेत असताना ट्रकचं चाक त्या भागात गुतलं व विहिरीवरील स्लॅब खचला. त्यामुळं तिथं मोठा खड्डा पडला असून ही घटना घडली," अशी प्राथमिक माहिती पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.
पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) पालिकेचे रस्ते पक्के : ट्र्क अचानक खड्ड्यात पडल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यांनी क्रेनच्या मदतीनं ट्रक खड्ड्यातून बाहेर काढला. दरम्यान, रस्ता खराब होता त्यामुळंच तिथं मोठा खड्डा पडल्याची चर्चा होती. यावर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं की, "रस्ता खराब असल्यानं खड्डा पडला ही खोटी माहिती आहे. पालिकेचे सर्व रस्ते पक्के आणि चांगले आहेत. घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे."
क्रेनच्या मदतीनं ट्रकला बाहेर काढलं : "आम्हाला चार वाजल्याच्या सुमारास माहिती मिळाली की, पुण्यातील बुधवार पेठ येथील पुणे शहर प्रधान डाक घर येथे जमिनीत अचानक खड्डा पडून एक ट्रक त्यात पडला. त्यानंतर लगेच घटनास्थळी आमचे जवान दाखल झाले व क्रेनच्या मदतीनं ट्रकला बाहेर काढण्यात आलं," अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली.
हेही वाचा
- तीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या, दोघे फरार - Nashik Crime
- मेळघाटात एसटी बस पेटली ; अग्निशमन दलाची गाडी पाण्याविना पोहोचली घटनास्थळी, बसचा झाला कोळसा - ST Bus Burnt In Fire
- कवर्धा येथील राणी दहरा धबधब्याच्या पाण्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू - Nagpur Engineer Death