महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील मॅनमार कंपनीत विषारी वायुची गळती; तिघांचा मृत्यू, 10 जण रुग्णालयात दाखल - GAS LEAK AT MYANMAR COMPANY

सांगली जिल्ह्यातील बोंबाळेवाडी-शाळगावच्या एमआयडीसीतील कंपनीत विषारी वायु गळती होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर १० जणांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

GAS LEAK AT MYANMAR COMPANY
सांगलीतील मॅनमार कंपनीत विषारी वायुची गळती (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2024, 11:00 PM IST

सातारा : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी- शाळगाव येथे असलेल्या एमआयडीसीतील मॅनमार कंपनीत गुरुवारी सायंकाळी विषारी वायुची गळती होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर कंपनी मालकासह १० जणांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. कंपनी मालकाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं तर अन्य ९ जणांना कराडमधील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कंडेन्सर फुटल्यानं वायू गळती : बोंबाळेवाडी-शाळगाव येथील एमआयडीसीत मॅनमार ही रासायनिक खते तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी सायंकाळी कंडेन्सर फुटल्याने कंपनीत विषारी वायुची गळती झाली. विषारी वायु एमआयडीसी आणि नजीकच्या नागरी वस्तीत पसरला. त्यामुळे नागरीकांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊ लागल्या. कंपनीचा मालक, महिला कर्मचारी आणि वॉचमनसह तीन जण आणि नागरी वस्तीतील ९ जणांची प्रकृती अत्यवस्थ बनली.

सांगलीतील मॅनमार कंपनीत विषारी वायुची गळती (Source - ETV Bharat Reporter)

विषारी वायुने दहा जणांना बाधा :विषारी वायु गळतीनंतर कंपनीतील कर्मचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांचे दहा जणांना बाधा झाली. त्यातील किशोर सापकर (बोंबाळेवाडी, ता. कडेगाव), अकाउंट विभागातील नीलम रेठरेकर (सध्या रा. मसूर, ता. कराड, मूळ रा. वांग रेठरे, ता. कडेगाव) आणि सुचिता उथळे (येतगाव, ता. कडेगाव) यांचा गुरुवारी रात्री कराडच्या सह्याद्रि रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शुभम यादव, प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक (वय ४ वर्षे), अजित विजय कांबीरे (रा. मसूर, ता. कराड), माधुरी पुजारी, सायली पुजारी (रा. बोंबाळे, ता. कडेगाव), गणेश माने (रा. येडे उफाळे, ता. कडेगाव) आणि आदित्य सावंत (रा. मसूर, ता. कराड) यांच्यावर सध्या कराडमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

आमदार विश्वजित कदमांकडून रुग्णांची विचारपूस : विषारी वायु गळतीनं तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सांगली जिल्हा हादरून गेला. घटनेनंतर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख गुरूवारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेची माहिती घेउन रुग्णांच्या उपचाराबद्दल प्रशासनाला सूचना केली होती. शुक्रवारी दुपारी आ. विश्वजित कदम यांनी कराडमधील सह्याद्रि रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टर आपल्यावर सर्वोत्तम उपचार करत आहेत. धोका टळला आहे. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, असा रूग्णांना धीर दिला.

भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत : रुग्णांची भेट घेऊन जाताना बाहेर बसलेल्या मृतांच्या कुटुंबातील महिलांनी आ. विश्वजित कदमांसमोर हंबरडा फोडला. आता भाऊ कुणाला म्हणायचं, असा आक्रोश त्या करत होत्या. आ. कदम यांनी त्यांना धीर दिला. कालपासून सगळेजण तुमच्यासोबत आहेत. डॉक्टरांनी शक्य ते प्रयत्न केले. भाऊ म्हणून मी सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत आहे. तुम्ही मन घट्ट करा, असा धीर देउन नातेवाईकांना त्यांनी सावरलं.

हेही वाचा

  1. भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 60 हून अधिक घरं जळून खाक झाल्याचा अंदाज
  2. भाजपाच्या मुंबई सचिवाने बांधले उद्धव ठाकरेंचं शिवबंधन, आता उद्धव ठाकरे म्हणतात...
  3. भिवंडीत वऱ्हाळदेवी तलावात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details