मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणी ईडीनं मुंबई आणि जयपूरमध्ये एकूण 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत अधिकाऱ्यांना या प्रकरणासंबंधित काही कागदपत्रं आणि डिजिटल पुरावे मिळाल्याची माहिती मिळत असून हे सर्व पुरावे गोळा करण्यात आलेत. तर यातील मध्यस्थ लालन सिंग यांच्याशी जोडलेल्या विविध डमी संस्थांकडून 'मेसर्स प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड'च्या खात्यांमध्ये ₹13.78 कोटी रुपये वळवण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. ही रक्कम मुंबईत टॉरेस ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळं मेसर्स प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या सहयोगी संस्थांची एकूण 21.75 कोटी रुपये किमतीची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
मुंबई आणि जयपूरमध्ये छापेमारी : याबाबत अधिक माहिती अशी की, ईडीनं टोरेस घोटाळ्यातील संशयितांच्या मुंबई आणि जयपूरमधील घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. यात सर्वेश सुर्वे संचालक असलेल्या उमरखाडी येथील मेसर्स प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, किशनपोल बाजार, जयपूर आणि जोहरी बाजार, जयपूर येथील मेसर्स जेमेथिस्ट यांच्या घरावर आणि कार्यालयात छापे टाकले आहेत. सोबतच ईडीनं मुलुंडमधील लालन सिंग आणि ऑपेरा हाऊसमधील संशयित हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद्र खारा यांच्या निवासी परिसराचीही झडती घेतली आहे. एका बाजूला या प्रकरणाच्या तपासात ईडीनं एन्ट्री घेतली आहे. तर, दुसरीकडं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ईओडब्ल्यूच्या माहितीनुसार, हा घोटाळा सुमारे 95 कोटी रुपयांचा आहे. या प्रकरणी मुंबईतून सुमारे सात हजार लोकांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत. तर, मुंबईबाहेर एकूण 400 तक्रारी दाखल झाल्या आहेत.