कोल्हापूर - बँकेत असणारी चांगल्या पगाराची नोकरी सोडून देऊन पर्यावरणासाठी जागृती करण्याच्या हेतूने तीन तरुण देशभर फिरत आहेत. 27 ऑक्टोबर 2022 पासून गेली पावणे दोन वर्षे ते ते तिघे देशभर शालेय मुलांसह देशवासीयांना पर्यावरण रक्षण किती गरजेचं आहे, याचे धडे कृतीतून देत आहेत. आतापर्यंत सुमारे अकरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केलेल्या मूळच्या पश्चिम बंगालमधील तिघांनी आज कोल्हापूरला भेट दिली. तिघांपैकी संगीता विश्वास या महिलेचं धाडस पाहून कोल्हापूरकरही अचंबित झाले.
दररोज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास डोळ्यासमोर पाहताना त्यांना असह्य वेदना होतात. आपणही पर्यावरणाच्या रक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूने तिघांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला आणि खासगी बँकेतील नोकरी सोडून दिली. देशभर पर्यावरणाचं महत्त्व सांगत प्रबोधनाचं काम करणारे हे तरुण कोल्हापूरातील दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
पश्चिम बंगालमधील चिंचोली हुबळी येथील प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा या तिघा पर्यावरण प्रेमींनी गो ग्रीन सेव अर्थ असा संदेश घेऊन आपला प्रवास सुरू केला. पर्यावरण आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी भारतभर भ्रमंती करून हा संदेश शालेय विद्यार्थी पर्यावरण प्रेमी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय त्यांनी मनी बाळगलं. यासाठी 27 ऑक्टोबर 2022 पासून भारत भ्रमंतीला प्रारंभ केला. त्यांनी तेव्हापासून आतापर्यंत देशातील पश्चिम बंगाल, ओडिसा छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा गुजरात, बिहार आणि आता महाराष्ट्र अशा 11 राज्यातून आतापर्यंत सुमारे साडेअकरा हजार किलोमीटरचा सायकलप्रवास या तिघांनी केला आहे. आज हे तिघे कोल्हापूरात दाखल झाले. कोल्हापुरातील पर्यावरण प्रेमींनी त्यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या कोल्हापूर मुक्कामानंतर गोव्याच्या दिशेनं हे तिघे रवाना होणार आहेत. अजूनही उर्वरित राज्यांचा प्रवास करण्यासाठी अडीच वर्ष लागणार असल्याचं प्रदीप विश्वास यानं सांगितलं.