बुलढाणा : येथील अमडापूरजवळ शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री एका भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या हिट अँड रन घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अमडापूर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. प्रतिक भुजे (वय 25 वर्षे), प्रथमेश भुजे (वय 26 वर्षे) आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. यातील प्रतिक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ होते, तर सौरभ त्यांचा मित्र होता.
असा घडला अपघात :बुलढाण्यात अमडापूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या हिट अँड रन प्रकारामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील चिखलीहून उदयनगरकडे हे तीन तरुण जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे चिखलीला काही कामानिमित्त गेले होते. परत येत असताना रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात भरधाव वेगानं जाणाऱ्या एका अज्ञात वाहनानं या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वाहनाचा शोध सुरू आहे.