मुंबई US Embassy Mumbai : मुंबईतील अमेरिकन दूतावासाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी वांद्रे कुर्ला पोलिसांनी शनिवारी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल :मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3.50 च्या सुमारास rkgtrading777@gamil.com या पत्त्यावरून ईमेल प्राप्त झाला. वांद्रे कुर्ला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 505 (1)(b) आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये, या अज्ञात व्यक्तीनं स्वत: ला फरार अमेरिकन नागरिक म्हटलं आहे.
अमेरिकन नागरिकांना ठार मारण्याची धमकी : पोलिसांनी माहिती दिली की, आरोपीनं अमेरिकन दूतावास उडवून देण्याची आणि तेथे काम करणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना ठार मारण्याची धमकी दिली. एफआयआरनुसार, ई-मेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं लिहिलं की, "मी फरारी अमेरिकन नागरिक आहे. माझ्यावर युनायटेड स्टेट्समध्ये 19 पेक्षा जास्त गंभीर आरोप आहेत. मला राष्ट्राध्यक्ष बायडनकडून तत्काळ जाहीर माफी हवी, नाहीतर मी प्रत्येक अमेरिकन दूतावास उडवून देईन. अनेक अमेरिकन नागरिकांनाही मारण्याचा माझा विचार आहे."
पुढील तपास सुरू आहे : यानंतर अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यात कळवलं आणि शुक्रवारी उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की, त्यांची एक टीम ई-मेल आयडीच्या आयपी पत्त्याची छाननी करून संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हे वाचलंत का :
- "साहेब सावध राहा, नाहीतर हे गुंड तुम्हाला...", छगन भुजबळांना निनावी पत्राद्वारे इशारा
- प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या पीएला धमकी; 20 कोटी खंडणीची मागणी, गुन्हा दाखल
- राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी, बिहारमधून एकाला अटक; छोटा शकील असल्याचा दावा